बायोमिथेशन प्रकल्पासंदर्भात आज मडगाव पालिका मंडळाची बैठक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

प्रकल्प उभारण्यासाठी सोनसड्यावर पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने टप्प्याटप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले होते. सुरवातीला १५ टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करून त्यानंतर टप्याटप्यात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. 

नावेली: मडगाव पालिका क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी लहान बायोमिथेशन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याऐवजी सोनसडो कचरा यार्डातच असे सात ते आठ प्रकल्प उभारण्यातसंदर्भात उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा पुजा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव पालिका मंडळाची खास बैठक बोलावण्यात आली आहे. 

कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी काही दिवसांपूर्वी सोनसडो कचरा यार्डाला भेट देऊन या प्रकल्पासंबंधी माहिती दिली होती, तर त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. 

प्रकल्प उभारण्यासाठी सोनसड्यावर पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने टप्प्याटप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले होते. सुरवातीला १५ टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करून त्यानंतर टप्याटप्यात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. 

यापूर्वी मडगावात पाच ठिकाणी उभारण्याचा विचार होता. दोन्ही मार्केटचा समावेश होता. मात्र, यासाठी कामगार जास्त लागणार असल्याने तसेच भविष्यात या भागातही उकिरडा होण्याची शक्यता गृहीत धरून सोनसड्यावर टप्याटप्याने प्रकल्प सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. 

सोनसड्यावरील जुने कचऱ्याचे ढिगारे पुढील एप्रिल महिन्यापर्यंत हटविण्यात येणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले होते. या प्रकल्पासाठी पालिका गंभीर असल्याचे नगराध्यक्षा नाईक यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या