
Goa Crime News: सध्या गोव्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असतानाच आज सकाळी नेसाय येथील कालव्याच्या बाजूला 21 वर्षे युवकाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला. हा कदाचित खुनाचा प्रकार असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत.
हा मृतदेह अख्तर रझा (21) या युवकाचा असून तो दिकरपाली येथे राहात होता. रविवारपासून तो बेपत्ता होता. आज सकाळी या कालव्याकडून जाणाऱ्या लोकांना हा मृतदेह दिसून आल्यावर त्यांनी मायणा-कुडतरी पोलिसांना त्याची माहिती दिली. यासंदर्भात दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांना विचारले असता, हा प्रकार खुनाचा आहे की, अन्य काही, ते अजून स्पष्ट झालेले नाही. शवचिकित्सा केल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल, असे त्यांनी सांगितले.
‘त्या’ कॉलनंतर फोन ‘स्वीच ऑफ’
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक मासे विकायचा. रविवारी दुपारी मासे विकून तो घरी आला होता. दुपारी जेवण करून बाहेर निघाला; पण घरी परतलाच नाही. रात्री एकदा त्याने कुटुंबीयांना फोन केला होता. मात्र, नंतर त्याचा फोन ‘स्वीच ऑफ’ येऊ लागल्याने दुसऱ्या दिवशी हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. हा मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. त्याची ओळख पटणे शक्य नव्हते. मात्र, त्याने घातलेल्या चपलांवरून त्याची ओळख पटवण्यात आली, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
अवैध कारनामे
नेसाय येथील कालव्याजवळ अनुचित प्रकार घडतात, अशी माहिती पीटर व्हिएगस यांनी दिली. या कालव्याजवळ कित्येक युवक मद्यपान करतात, काहीजण ड्रग्स ही घेतात. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त ठेवावी, अशी मागणी यापूर्वीही केली होती. या भागात अनोळखी युवकांना येऊ देऊ नये, असे व्हिएगस म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.