साखळीत औषधालयाला आग; लाखोंचे नुकसान

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. साखळी येथील श्री राधाकृष्ण मंदिरासमोरील शांता इमारतीतील ''दौलतराव मेडिकल स्टोअर्स'' या औषधालयाला ही आग लागली.

डिचोली: सोमवारी पहाटे साखळी येथे एका औषधालयाला भीषण आग लागून संपूर्ण औषधालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. नागरीक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणेपर्यंत औषधालयातील औषधे आदी ऐवज जळून खाक झाला. आगीच्या या घटनेत सुमारे ५० लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. तर आगीत महागडी औषधे आदी ऐवज जळाल्याने १.१० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा औषधालयाचे मालक बलसिंग डी. देसाई यांनी केला. त्यामुळे अग्निशमन दलातर्फे नुकसानीची पडताळणी सुरू आहे. 

या घटनेत शेजारील एका दुकानासह इमारतीतील अन्य फ्लॅटना किरकोळ झळ बसली. जिवीतहानी सारखी विपरीत घटना मात्र घडली नाही. 

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. साखळी येथील श्री राधाकृष्ण मंदिरासमोरील शांता इमारतीतील ''दौलतराव मेडिकल स्टोअर्स'' या औषधालयाला ही आग लागली. आग नेमकी कशी लागली, त्यासंबंधी नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. 

पहाटे साधारण सव्वा पाच वाजता आगीच्या घटनेसंबंधी डिचोली अग्निशमन दलाला कॉल येताच  दलाचे अधिकारी श्रीपाद गावस आणि अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली  लिडिंग फायर फायटर आर. ए. गावस, डी. जी. गावस यांच्या नेतृत्त्‍वाखाली एस.ए. साळकर, व्ही.एम.गाड, एस.सी. केसरकर, व्ही.एन.राणे, जी.जी.नाईक, एस.ए.गावस, एम.बी.देसाई, आर.एम. एकावडे, बी.एम.मांद्रेकर आदी  दलाच्या जवानांनी बंबासहीत घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीचा भडाका उडाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी निकाराचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन बंबचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या