आयआयटीसाठी सरकारकडून हुकूमशाही; मेळावलीवासीयांचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

नागरिकांनी वाळपई शहरातून रॅली काढून ‘आधी आमच्या पोटच्या जमिनी नावावर करा’ अशी मागणी घोषणा देत करण्यात आली. तसेच ‘सोडणार सोडणार नाही जिंकल्या शिवाय गप्प राहणार नाही’, ‘आयआयटी गो बॅक’ अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या. 

वाळपई: मेळावली- सत्तरी येथे काल बुधवारपासून सरकारने आयआयटी संस्था बांधणीसाठी जमीन सर्वेक्षण करून सीमा निश्‍चितीसाठी मोजमाप करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे, पण हे काम बेकायदेशीर असून सरकार लोकशाही मार्गाने नव्हे, तर हुकुमशाहीने आयआयटी आणत आहे. यासाठी अजून गुळेली ग्रामपंचायतीची खास ग्रामसभा घेतलेली नाही. लोकांचे म्हणणे ग्रामसभेतून एैकलेले नाही. सरकारने हे सर्वेक्षण काम त्वरित बंद करावे, अशी जोरदार मागणी मेळावलीवासीयांनी केली आहे. 

मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव समितीतर्फे आज वाळपई येथे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी वाळपई काँग्रेस गट समितीने सहभाग घेतला होता. निवेदनानंतर नागरिकांनी वाळपई शहरातून रॅली काढून ‘आधी आमच्या पोटच्या जमिनी नावावर करा’ अशी मागणी घोषणा देत करण्यात आली. तसेच ‘सोडणार सोडणार नाही जिंकल्या शिवाय गप्प राहणार नाही’, ‘आयआयटी गो बॅक’ अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या. 

याविषयी शुभम शिवोलकर म्हणाले, की कालपासून जे मेळावलीत सरकारने जमीन आखणीचे काम सुरू केले आहे, ते चुकीचे आहे. गुळेली पंचायतीने याबाबत ग्रामसभा घेतलेली नाही व असे असून देखील सरकार पंचायतराज घटनेचा अपमान करीत आहे. पंचायतराजनुसार स्थानिकांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. ग्रामसभा न घेताच सरकारने संस्थेच्या कामासाठी निविदा काढली आहे. आम्ही गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ते आतापर्यंत राज्य सरकारपासून केंद्र सरकारला अनेकांना निवेदने सादर केली आहेत. त्याचे अजूनही उत्तर दिलेले नाही. वाळपई मामलेदार कार्यालयात जमीन मोजमाप कामाविषयी विचारल्यास ते काम वरिष्ठांच्या आदेशानुसार केले जात आहे असे सांगण्यात येते. 

वाळपई काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर म्हणाले, मेळावलीतील जमीन आखणीच्या कामाचा वाळपई काँग्रेस निषेध करीत आहे. सत्तरीत लोकांच्या जमिनी नावावर नाहीत. ती समस्या सोडविण्याचे सोडून सरकार बळजबरीने आयआयटी बांधण्याचा घाट घालीत आहे. त्यामुळे आता काँग्रेस आंदोलन उग्र करणार आहे. 

रणजीत राणे म्हणाले, सत्तरीत भूमिपुत्रांना जमीनमालकी मिळालेली नाही. मेळावलीत तसे भूमिपुत्र काजू बागायतदार आहेत. त्यांना न्याय दिला जात नाही. दरम्यान, रॅली काढल्यानंतर वाळपई शहीद स्तंभाकडे मेळावलीवासीयांनी धरणे धरले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या