''माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे''
Goa is a mine of many natural beauties Situated in the foothills of the Sahyadri

''माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे''

बोरकरांच्या ह्या कवितेत गोव्याचे संपूर्ण स्वरूप दिसते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माझ्या गोव्यात अनेक निसर्ग सौंदर्याची खाण आहे. अनेक संतांनी इथे जन्म घेतला, वावरले. भक्तांच्या हाकेला धावणारी अनेक जागृत देवस्थाने इथे आहेत. नयनरम्य समुद्रकिनारे, सायंकाळची शोभा, डोळे दिपवून टाकणारा सभोवतालचा निसर्ग.

संत सोहीरोबानाथ आंबीये सारखे संत ज्यांनी संपूर्ण विश्वाला ''अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे!'' हा मंत्र दिला. विठ्ठल केरीकर, कृष्णदास शामा ह्यांसारख्या अनेक संतांची ही भुमी. फा. स्टिफन्सनी मराठीची महती गायली, परप्रांतीय, परभाषिक असूनही त्यांनी मराठी भाषेत बायबलची रचना केली. संतांची ही भूमी. लोककलेची खाण असलेली ही भूमी. एकच भाषा पण वेगवेगळ्या प्रांतात तिला वेगळे स्वरुप येते. पेडणे पासून ते काणकोण पर्यंत एकमेकांना बांधून ठेवणारी ही भूमी. वेगवेगळे सण उत्सवाची इथे जणू मेजवानीच. सत्तरी सारख्या प्रदेशात निसर्गाच्या एका वेगळ्याच कलाकृतीचे दर्शन होते.

वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या प्रांतातील लोकांचा इथे वास्तव. त्यांचे सणवार, त्यांच्या लोककला इथे जोपासल्या जातात. एकमेकांना सांभाळून एकमेकांच्या सणवारांना सांभाळून गुण्यागोविंदाने इथे सगळेच वावरतात.वेगवेगळे सण उत्सव हल्लीच झालेला पेडणेचा दसरोत्सव, बोडगेश्वराची जत्रा, कवळेच्या शांतादुर्गा देवीची जायेच्या फुलाची जत्रा, शिरगावच्या लयराईची देवीची मोगऱ्याची जत्रा, मालीनी पुनव, शिमगोत्सवातील गडे, ओल्डगोवाचे फेस्त ह्या सारख्या वेगवेगळ्या प्रांतातील सण उत्सव साजरे करताना सगळे गोवेकर एकत्र येऊन साजरे करतात. 

गणेशचतुर्थी, दिवाळी, शिमगोत्सव, नाताळ, हे मुख्य सण. ह्याच्यामध्येंपण वेगळेपण. एका प्रांतात साजरा केलेला सण दुसऱ्या प्रांतात अगदी तस्साच साजरा  होत नाही. धालो, फुगडी, सरवणचा मोरूलो, मुसळनृत्य, धनगरनृत्य, कुणबीनृत्य, कट्ट्यांचेनृत्य, गोफ, समईनृत्य ह्या सारख्या ना ना प्रकारची लोकनृत्ये प्रत्येक सणांना सादर होतात‌. दीपोत्सवामध्ये संपूर्ण भूमी वेगवेगळ्या दिव्यांनी प्रज्वलित होऊन एक दिव्यांचा उत्सव साजरा होतो.  भूमिका, राष्ट्रोळी, भूतनाथ, माऊली, शांतादुर्गा, मोरजाई ह्या मुख्यदेवदेवतांची पूजा केली जाते. वेगवेगळी शेती इथे पिकवली जाते. भात, मिरची, केळी, माड, पोफळी, उडीद, कुळीथ ह्यांसारख्या ना ना प्रकारची शेती केली जाते. पेडणे पासून काणकोण पर्यंत समुद्र किनारे, नयनरम्य दृश्ये, सुर्यास्त. डोंगर कपारी, धबधबे, अन् बरंच काही जे मन तृप्त करून सोडतात.  एवढं सगळं असुनही जेव्हा कुठेही गोव्याचा उल्लेख होतो तेव्हा फक्त दारू पिऊन पडणे किंवा समुद्र किनारे, छोटे-छोटे कपडे घालून फिरणारे लोक दाखवतात जे पाहून मनात एक विचित्र विचार सुरू होतात. गोव्यातील लोक म्हणजे काहीही उपयोग नसलेले असे उदगार काढतात ''सूशागात'' लोक म्हणजे गोयकार असेही म्हटले जाते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com