गोव्यातील खाण प्रकरणाची सुनावणी तूर्त लांबली! खाणी सुरू होण्याची शक्यता अंधूक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी नैसर्गिक न्यायानुसार खाणपट्टाधारकांना खाणपट्टा नूतनीकरणाची दुसरी संधी मिळावी, अशा मागण्या करणाऱ्या याचिकांवर या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता मावळली आहे.

पणजी : गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी नैसर्गिक न्यायानुसार खाणपट्टाधारकांना खाणपट्टा नूतनीकरणाची दुसरी संधी मिळावी, अशा मागण्या करणाऱ्या याचिकांवर या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता मावळली आहे. या आठवड्यात सुनावणीस घ्यावयाच्या याचिकांच्या यादीत या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आलेल्या नाहीत. राज्य सरकारने 88 खाणपट्ट्यांचे दुसऱ्यांदा केलेले नूतनीकरण रद्द ठरवत त्या खाणपट्ट्यांतील खाणकाम बंद ठेवण्याच्या 7 फेब्रुवारी 2018 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे.

गोव्यातील त्या पाच पालिकांचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून राखीव

गेल्या आठवड्यात न्यायालयात त्या याचिकेचा उल्लेख झाला होता. त्यावेळी खाण कंपन्यांच्या याचिका पुढील आठवड्यात सुनावणीस येतील, असे वाटले होते. मात्र, ती शक्यता आता मावळली आहे. खाण कंपन्यांनी देशभरातील इतर खाणपट्टाधारकांना खाणपट्ट्यांचे दोनवेळा नूतनीकरण करण्याची संधी दिली गेली. तोच न्याय गोव्यातील खाणपट्टाधारकांना लावावा, अशी मागणी करणाऱ्या याचिका सादर केल्या आहेत. त्यावर आता सुनावणी होणे बाकी आहे. राज्य सरकारला खाणी सुरू करण्यात यश आले नाही, तर येत्या 15 मार्चपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर खाण उपकरणे उभी करू, ट्रक उभे करू असा इशारा गोवा खाण लोकमंचाने दिला आहे.

सासष्‍टीत अठरा महिन्‍यांत नऊ खून

त्यांनी याआधी पणजीत मोर्चा काढून सरकारला यातून योग्य तो धडा घ्या, असा संदेश दिला आहे. सरकार संसदीय मार्गाने तोडगा काढू, असे सांगत असले तरी त्यादिशेने म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. उच्चस्तरीय मंत्रिगट स्थापन करूनही त्यातून नेमके कशा पद्धतीने खाणी सुरू केल्या जातील याविषयी स्पष्टता नाही. त्यातच न्यायालयात सुनावणीच होणार नसल्याने न्यायालयीन मार्गही सध्या उपलब्ध नाही. यामुळे खाणी सुरू होण्याची शक्यता अंधूक झाली आहे.

संबंधित बातम्या