वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी घेतली समस्यांची दखल; तिमाहीत प्रश्न मार्गी लावण्याची तयारी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

अमुक एका पदावर बढती मिळण्यासाठी जितक्या वर्षांच्या अनुभवाची गरज आहे तितक्या वर्षांचा अनुभव हा असलाच पाहिजे. त्या नियमांत दुरुस्ती करता येत नाही. वीज खात्याचाच मुख्य अभियंता असावा असे सरकारला वाटते. त्यासाठी जे काही करणे शक्य आहे, ते केले जात आहे आणि केलेही आहे. - नीलेश काब्राल, वीजमंत्री

पणजी: वीज खात्याला खात्यांतर्गत मुख्य अभियंता मिळावा, अशी सरकारची इच्छा आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी खात्यांतर्गत रखडलेल्या बढत्या आणि इतर प्रश्नांत लक्ष घातले आहे. येत्या तिमाहीत खात्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केले आहे. मात्र अनुभवाची अट शिथिल करण्याच्या पक्षाचे ते नाहीत.

वीज खात्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर काब्राल यांनी अहवालच तयार करून घेतला आहे. त्यानुसार अनेक कामचुकार कर्मचाऱ्यांची माहितीही त्यांनी संकलित केली आहे. ज्या पदावरील कर्मचाऱ्याने खांबावर चढणे आवश्यक आहे, तो कर्मचारी कार्यालयातच बसून वेतन कसे घेतो, याची माहितीही त्यांनी मिळवली आहे, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांना वीज खात्याच्या सेवेतून मोकळे करावे यासाठी त्यांनी मध्यंतरी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्यांना त्यात अनेक कारणांमुळे यश आले नाही.

आता काब्राल यांनी अभियंत्यांच्या प्रश्नांकडे लक्ष पुरवणे सुरू केले आहे. हा प्रश्न अधिक जटिल न होता सोडवला गेला पाहिजे असे त्यांना वाटते. यासाठी त्यांनी प्रश्नांविषयी मूलभूत माहिती गोळा करणे सुरू केले आहे. अभियंत्यांशी बोलून यातून मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्‍न आहे. अमुक वर्षी हे झाले नाही म्हणून आता हा प्रश्न उभा राहिला अशी कारणमीमांसा करत बसण्यापेक्षा आता काय केले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष पुरवणे सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात अभियंत्यांचा लटकलेला प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या