Sugar TurDal scam: प्रकरणी मंत्र्यांनी हात झटकले

सरकारी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार
Turdal, sugar scam
Turdal, sugar scamDainik Gomantak

पणजी: तूरडाळ आणि साखर नासाडी प्रकरणी नागरी पुरवठा आणि ग्राहक सेवा खात्याच्या आजी-माजी मंत्र्यांनी एकमेकांकडे बोट दाखवत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या सचिव आणि संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. विरोधकांसह नागरिकांनी मात्र या प्रकरणाबाबत प्रचंड संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात जनतेला देण्यासाठी राज्य सरकारच्या नागरी पुरवठा आणि ग्राहक सेवा खात्याने आणलेली 400 मेट्रिक टन तूरडाळ आणि 22 मेट्रिक टन साखर खरेदी करून तालुका स्तरावरील गोदामांमध्ये साठवून ठेेवली होती.

कोरोना काळात आणि नंतर स्वस्त धान्य दुकानांमार्फत यापैकी 158 मेट्रिक टन तूरडाळीचे आणि 11.7 मेट्रिक टन साखरेचे वितरण करण्यात आले. मात्र, 242 मेट्रिक टन तूरडाळ सडली, तर 10.3 मेट्रिक टन साखर विरघळल्याचे समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता दक्षता खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली असून खात्याचे विद्यमान मंत्री रवी नाईक यांनी हे प्रकरण आपण खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वीचे असून संचालकांना चौकशीचे दिले आहेत, असे म्हटले आहे, तर या खात्याचे माजी मंत्री गोविंद गावडे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला तयार असून आपणच या प्रश्‍नी राजशेखर यांची समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते, असे स्पष्ट केले आहे.

यावरून मंत्री गावडे आणि नाईक यांनी एक प्रकारे आपले हात झटकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या प्रकरणाची दक्षता खात्याकडून चौकशी होईल. त्यामुळे खात्याचे यापूर्वीचे संचालक आणि सचिवांवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता असून संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

हे प्रकरण आपण खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वीचे असून आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, धान्याची नासाडी होणे हे वाईट आहे. दक्षता खात्याच्या चौकशीत काय सिद्ध होईल, ते जनतेला कळेलच. माझा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. असे नागरी पुरवठा आणि ग्राहक सेवा खात्याचे विद्यमान मंत्री रवी नाईक यांनी स्पष्ट केले.

यावर बोलताना नागरी पुरवठा आणि ग्राहक सेवा खात्याचे तत्कालीन मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, गोदामांमध्ये जी डाळ सडली, ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले होते. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ शकतो. याबाबत माझ्याकडे सर्व कागदपत्रे असून तत्कालीन अधिकाऱ्यांकडून चूक झाली आहे का, हे तपासावे लागेल.

मंत्री, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

सुरवातीला तूरडाळ आणि नंतर साखर खराब झाल्याचे लक्षात आल्यानंतर यावरून आरोप-प्रत्याररोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले असून जनतेमध्येही या प्रकरणी रोष दिसून येत आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असा सूर उमटत आहे.

भाजप सरकारने सुमारे 3.5 कोटींची तूरडाळ आणि तब्बल 10.3 मेट्रिक टन साखरेची नासाडी केली. त्यामुळे कष्टकऱ्यांचा भाजप सरकारला ‘शाप’ लागेल. या प्रकाराला जबाबदार असलेले मंत्री आणि अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. बीना नाईक, अध्यक्ष, महिला काँग्रेस.

अन्य धान्यांचीही तपासणी सुरू

राज्यात नागरी पुरवठा खात्यामार्फत विविध प्रकारच्या धान्याचे वाटप करण्यात येते. यासाठी केंद्राच्या अनुमतीने कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी होते. हे धान्य वर्षभर पुरावे, यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गोदामांमधून साठवून ठेवण्यात येते. तूरडाळीच्या सडण्यामुळे खात्याने इतर धान्यांची काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी तपासणी सुरू केली असून अधिकाऱ्यांना गोदामातील धान्याचा अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com