आयुष मंत्रालयाकडून पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपीचे इ-बुक प्रसिद्ध

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कोविड कालावधीतच नव्हे, तर अन्य आजाराला प्रतिकार करण्यासाठी शक्ती देण्याचे सामर्थ्य या रेसिपीत असल्याचे दावे या पुस्तकात करण्यात आले आहेत. पोषण सप्ताहात हे पुस्तक उपलब्ध झाल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आले आहे.

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त पेज, अळूवडी, ताक, सूप, लाडू इत्यादी पौष्टिक पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या रेसिपीचे इ-बुक केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. 

कोविड कालावधीतच नव्हे, तर अन्य आजाराला प्रतिकार करण्यासाठी शक्ती देण्याचे सामर्थ्य या रेसिपीत असल्याचे दावे या पुस्तकात करण्यात आले आहेत. पोषण सप्ताहात हे पुस्तक उपलब्ध झाल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी आयुष मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात पारंपरिक खाद्यपदार्थांच्या आठवणींना उजाळा देत त्यासंदर्भात माहिती संकलनाच्या सूचना मंत्रालयाला केल्या होत्या. वर्षभरात मंत्रालयाने मेहनत, संशोधनाच्या माध्यमातून पंचवीस खाद्यपदार्थांच्या रेसिपी तसेच अनेक चटण्यांच्या पाककृती सामावून घेणारे सुमारे पन्नास पानी सचित्र इ-बुक तयार केले आहे.

बऱ्याच डॉक्टरांना हे पुस्तक पाठवण्यात आले असून त्यांनी आपले चाहते, मित्रमंडळींना ते ‘फॉरवर्ड’ केले आहे. या पुस्तकातील पाककृती तयार करण्याची पद्धत उत्तर, दक्षिण भारतीय संस्कृतीत मोडणारी असली तरी तत्सम पाककृती इतर राज्यांतील खाद्य संस्कृतीशी साम्य दाखवणाऱ्या आहेत हे विशेष.

नाचणी, पोहे, उकडा तांदूळ, बेसन तसेच स्थानिक पालेभाज्या, मसाल्यांचा वापर या पाककृतीत झाला असल्याचे पुस्तकाचे वाचन करताना लक्षात येते.

आवळ्याचे पानक, आवळा स्क्वॅश, कारल्याच्या बियांचे लाडू, शेवग्याची पाने व नाचणी, बाजरीच्या पीठाचा डोसा, बेसन व रव्याचा डोसा, नाचणी व केळ्यांची स्मुदी, ताक व ताकाच्या कढीचे दोन प्रकार, अळुवडी, युष, खजूर द्राक्षाचे शक्तीवर्धक पेय, मटण सूप, कुळीथ रसम, उकड्या तांदळाची साधी पेज, आलेपाक वडी, गुलकंद, बीटरुट हलवा, मोड काढलेल्या मेथीचे, आवळ्याचे स्टर फ्राय इत्यादी रेसिपींचा आस्वाद पुस्तकातून देण्याचे प्रयत्न झाले आहेत.

केंद्रीय आयुष मंत्रालयातील आयुष विभागाची ही कामगिरी असून त्यासाठी डॉ. सुलोचना भट यांनी समन्वयक अधिकारी म्हणून काम केले आहे, तर संयुक्त सचिव डॉ. ए. रघू यांचेही योगदान संशोधनासाठी लाभलेले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या