गोमेकॉमध्ये असलेली चाचणी व्यवस्था मडगावात सुरू करा: विजय सरदेसाई

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आली असून जोपर्यंत कोरोनावर रोख लागत नाही, तोपर्यंत अन्य कुठल्याही विषयाला महत्व देणे व्यर्थ आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. 

सासष्टी: गोव्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे आवश्यक असून सध्या राज्याची स्थिती बिकट असताना राजकीय सर्वेक्षण करणे योग्य नाही. सरकारने कोरोनासंबंधी लोकांची दिशाभूल न करता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित पाऊले उचलावी, अशी मागणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. तसेच सरकारने गोमेकॉमध्ये असलेली चाचणी व्यवस्था मडगावातही सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माडेल - फातोर्डा येथे व्ही फॉर फातोर्डातर्फे आयोजित केलेल्या वनमहोत्सव कार्यक्रमात आमदार सरदेसाई यांनी वरील मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष पूजा नाईक, नगरसेवक बबिता प्रभुदेसाई, माजी नगरसेवक, गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते प्रशांत नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. फातोर्डा मतदारसंघाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंनी गोमंतकीय प्रतिक असलेली प्रत्येकी ७० झाडे लावण्यात येणार आहे, असे सरदेसाई यांनी जाहीर केले. 

राज्यात वाढणाऱ्या कोविड रुग्णांमुळे स्थिती हाताबाहेर जात असताना त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असून सरकारने सर्वेक्षण करणे योग्य नाही. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आली असून जोपर्यंत कोरोनावर रोख लागत नाही, तोपर्यंत अन्य कुठल्याही विषयाला महत्व देणे व्यर्थ आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. 

कोरोनाची चाचणी अहवाल येण्यास धिरंगाई होत असून अहवाल येईपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची स्थिती बिकट होत आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविड रुग्ण अखेरच्या वेळी इस्पितळात उपचारासाठी येत असल्याने मरण पावत असल्याचे विधान केले होते. 

या विधानाचे खंडन करताना विजय सरदेसाई यांनी वरील स्पष्टीकरण दिले. सरकारने कोविड चाचणीचा अहवाल त्वरित मिळण्यासाठी पाऊले उचलावीत, अहवाल लगेच मिळाल्यास लोकांना अखेरच्या वेळी इस्पितळात भरती होण्याची आवश्यकता भासणार नाही, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या