Goa Monsoon Update: रेड अलर्ट कायम; मुसळधार पावसामुळे उड्डाणे रद्द

Goa Monsoon Update: रेड अलर्ट कायम; मुसळधार पावसामुळे उड्डाणे रद्द
Goa Monsoon Update

पणजी: दक्षिण कोकणात(Koukan) अरबी समुद्राच्या(arabian sea) किनारपट्टीपासून 8.8 किमी उंचीवरून वादळी वारे वाहू लागल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आजही रेड अलर्ट जारी असणार आहे, असे हवामान वेधशाळेने कळविले आहे. सोमवारी राज्याच्या विविध भागांत पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी आज 204.4 मिमी पावसाची शक्यता आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस होणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. (Goa Monsoon Update Red alert maintained due to Heavy rains flights cancelled)

वेधशाळेचा अंदाज खरा
गेल्या दोन दिवसांपासून हवामान वेधशाळेकडून राज्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला होता. त्यानुसार पावसाने हजेरीही लावली. रविवारी मध्यरात्रीपासूनच सगळीकडे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाळपई आणि सत्तरी भाग वगळता सकाळी 11 पर्यंत पावसाचा जोर सुमार होता.पण दुपारनंतर पावसाने झोडपून काढले. पणजी शहरात सकाळपासून संततधार होती, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका प्रवाशांना बसला. सकाळच्या प्रहरात बाजारपेठेत दिसणारी गर्दी आज बऱ्यापैकी ओसरली होती. वांते सत्तरी आणि वाळपई येथे सकाळपासून मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. तर मुरगाव-चिखली येथे दोन झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडचण झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्ता मोकळा केला.

काही विमाने रद्द
पावसामुळे व हवामानातील बदलामुळे सोमवारी विमानांच्या उड्डाणावर परिणाम झाला. अतिवृष्टीमुळे दाबोळी विमानतळावर उतरणारे कन्नूर-गोवा-कन्नूर हे सकाळचे विमान रद्द करण्यात आले. संध्याकाळी एअर इंडियाचे 512 हे कोचिन-गोवा, एअर इंडियाचे 513 गोवा-दिल्ली विमानास प्रतिकूल हवामानामुळे एक तास उशीर झाला. कोविड महामारीमुळे दाबोळी विमानतळावर सध्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कन्नूर अशी दहाच विमाने उतरतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत...
राज्यात माॅन्सून दाखल झाल्यानंतर स्थिरस्थावर होण्यासाठी पाच दिवस लागले. त्यानंतर आजपर्यंत 240.1 मिमी पाऊस पडला. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत 295.3 मिमी पावसाची नोंद झाली होती. राज्यातील आजच्या दिवसांपर्यंतची सरासरी 207.4 इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो 55 मिमी इतका कमी आहे.

नुकसानीची शक्यता
आज होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पुरासह रस्ते, पूल, पिके यांच्या नुकसानीची शक्यता आहे. तसेच झाडांसह घाटात भूस्खलन आणि दरड कोसळण्याची शक्यता तसेच 24 तासांत 204 मिमी पाऊस होईल, असा अंदाज आहे.

चार ठिकाणी पडली झाडे  
सोमवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे 4 ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडण्याच्या घटना घडल्या.  झाडे पडल्याने वाहतुकीची काही वेळ कोंडी झाली. वास्को, डिचोली, कुडचडे व फोंडा या भागांत प्रत्येकी मोठे झाड पडले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. याव्यतिरिक्त झाडाच्या फांद्या मोडून पडल्याचे प्रकार घडले असले तरी मोठी हानी झालेली नाही. पणजीत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. वादळी वाऱ्यासह नसल्याने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कमी प्रमाणात कॉल्स आल्याची कक्षाच्या कर्मचाऱ्याने दिली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com