Goa Monsoon Update: पहिल्याच पावसात पाच कोटी पाण्यात
Goa Monsoon Update

Goa Monsoon Update: पहिल्याच पावसात पाच कोटी पाण्यात

पणजी: काल बुधवारी राज्याला(Goa) वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दोन दिवस राज्यात ‘रेड अलर्ट’(red alert) असताना जेवढा पाऊस(Rain) झाला नव्हता, त्याहून अधिक पाऊस काल झाला. सुदैवाने राज्यात कुठेही मोठी दुर्घटना घडली नाही. ‘ऑरेंज अलर्ट’ पुढील दोन दिवस वाढविण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरातील हवामानाचा दाब कमी होऊन दक्षिण कोकणात अरबी समुद्राच्या किनारपट्टीपासून 8.8 किमी उंचीवरून वादळी वारे वाहू लागले आहेत. त्याशिवाय कर्नाटक आणि केरळमधील किनारी भागातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर अचानक वाढला. बुधवारी राज्यात ऑरेंज अलर्ट होता. (Goa Monsoon Update One and a half meters of construction collapsed Loss of five crores)

बंगालच्या उपसागरात जलद घडामोडी होत असल्याने वातावरणात बदल होत आहेत. परिणामी, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील. वाऱ्याचा जोर वाढला असला तरी त्यामुळे धोका संभवणार नसल्याने रेड अलर्ट जारी नाही. 
-एम. राहुल, हवामान वेधशाळा, पणजी

ओर्लीतील पदपथांचे नुकसान

मोठा गाजावाजा करून ओर्ली येथे गोवा साधनसुविधा महामंडळाने हातात घेतलेले पाच कोटींच्या सौंदर्यीकरणाचे काम पहिल्याच पावसात कोसळून गेल्याने हे पाच कोटी पाण्यात गेले. ओर्ली येथे रस्त्याच्या शेजारी पदपथ बांधणे आणि त्या जागेचे सौंदर्यीकरण करणे असा हा प्रकल्प होता. शेताच्या धडेला हे बांधकाम करण्यात आले होते. मागचे दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या धडेची माती कोसळल्याने सुमारे दीड मीटर अंतराचे बांधकाम कोसळले.
काँग्रेसच्या रोयोला फेर्नांडिस यांनी या प्रकरणी आरोप करताना ही जमीन भुसभुशीत आहे त्यामुळे येथे बांधकाम करू नये अशी मागणी आम्ही महामंडळाकडे केली होती. पण तुम्ही अभियंते आहात का? असे त्यावेळी आम्हाला विचारले जात होते. आता आम्ही जी भीती व्यक्त केली होती ती खरी ठरली आहे असे त्या म्हणाल्या. यासंबंधी चौकशी करून अभियंते, सल्लागार एजन्सी आणि कंत्राटदार यांना दोषी ठरवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.

दीड मीटर बांधकाम कोसळले

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनीही यावर टीका करताना हाच तो भाजप सरकारचा विकासाचा मॉडेल असे म्हटले असून गोव्यातील सर्व बांधकामांना आधी भेगा पडतात आणि नंतर ते कोसळून पडणे हे आता नित्याचे झाले आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना विचारले असता, हे बांधकाम कसे पडले त्याची चौकशी महामंडळ करणार, हे बांधकाम पडले म्हणून विरोधक मला दोष का देतात तेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे बांधकाम पडले म्हणून गळा काढणारे हे एनजीओ दोन दिवसांपूर्वी बाणावलीत एका माणसाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला त्यावेळी कुठे होते असा सवाल केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com