Mopa Airport: मोपा अन् काढल्या झोपा! 'खरी कुजबूज'

Mopa Airport: 'तुम्ही विमानतळावर या हॉलमध्ये बसा, मी पाहाणी आटोपून तुमच्याशी बोलतो' असे गोड आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
Mopa Airport Project
Mopa Airport ProjectDainik Gomantak

Mopa Airport: शुक्रवारी मोपा विमानतळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नियोजनानुसार सायंकाळी 4 वाजता पोचणार होते. पण ते सव्वातास उशिरा आले. मुख्यमंत्री येणार म्हणून भाजप कार्यकर्ते, सरपंच मोठ्या संख्येने तासभर अगोदरच येऊन विमानतळाच्या गेटबाहेर थांबले होते. मुख्यमंत्र्यांनी आल्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काहींनी नोकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. नंतर पेडणे आमदाराला विश्वासात घेतले जात नाही, अशी तक्रार केली.

या प्रश्नांची उत्तरे देणे तसे  कठीणच होते. पण मुख्यमंत्र्यांनी हसतच उत्तरे देऊन वेळ मारून नेली. ‘तुम्ही विमानतळावर या. हॉलमध्ये बसा, मी पाहाणी आटोपून तुमच्याशी बोलतो’ असे गोड आश्वासन त्यांनी दिले. एक तास झाला, दोन तास झाले, चहा नाही, पाणी नाही. ज्यांच्याकडे गाड्या होत्या, त्यापैकी काहीजण एक एक करून सटकू लागला. कुणी तरी सांगितले की, मुख्यमंत्री विमानातून दाबोळीवर गेले. यामुळे कार्यकर्ते खवळले.

काही निष्ठावंतांनी ‘मुख्यमंत्री येणारच’ असे सांगून त्यांना धीर दिला. काहीजण स्थानिक नेत्याचे मन दुखावू नये म्हणून नाईलाजास्तव बसून राहिले. एकाच जागेवर बसून झोप येऊ लागली. काहींनी मस्तपैकी डुलक्या काढल्या. पण आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री साडेतीन तासांनंतर तेथे आले. मुख्यमंत्री आल्यावर मात्र बऱ्याचजणांना झोपेतून जागे करावे लागले.

आनंदाची पर्वणी की...

सरकारने राज्यातील बेरोजगारांसाठी मेगा जॉब फेअर ताळगाव पठारावरील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 8 नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहे. पणजी आणि ताळगावच्या आमदारांनी यानिमित्ताने आपल्या मोठ्या छबीसह मतदारसंघात ठिकठिकाणी पोस्टर्स लावून आपण जनतेचे कैवारी असल्याचे दाखवून दिले आहे.

या जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने ही खूप आनंदाची बाब असल्याचे सांगत शनिवारी सरकारने जॉब फेअरच्या अर्जांसाठी आणखी एक दिवसाची मुदतवाढ केली आहे. जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला, तरी ही बाब सरकारच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारी आहे, हे संबंधितांच्या लक्षातही आलेले नसावे.

कारण या जॉब फेअरच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारांची संख्या किती वाढली आहे, हे स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. पण ही गोष्ट आनंदाचे भरते आलेल्या सरकारला सांगणार तरी कोण?

आठ तारखेचे असेही कोडे

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मोपा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुसज्ज झाला असून आता त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणे बाकी आहे. खरे तर राज्यातील आयुर्वेद, कला अकादमी आणि इतर काही प्रकल्पांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्याचे घाटत आहे. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी हा खटाटोप आहे.

पण खरा प्रश्‍न आहे तो मोपा किंवा अन्य प्रकल्पांचे उदघाटन 8 डिसेंबरला होणार का? कारण 8 डिसेंबर हा दिवस खास करून पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा दिवस आहे.

यादिवशी गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मोदीच काय, कोणताही राजकीय नेता इतक्या महत्त्वाच्या दिवशी आपले राज्य सोडून अन्य कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे मोपा किंवा अन्य प्रकल्पांसाठीचा आठ तारखेचा मुहूर्त फलदायी ठरणार का? उदघाटनाचा हा मुहूर्त आणखी पुढे ढकलला तर जाणार तर नाही ना, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

ताळमेळ बसणार का?

राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीनंतर माध्यान्ह आहार मिळणार की नाही, याची धाकधूक होती. सधन पालक मुलांना मधल्या सुट्टीत खाऊसाठी पॉकेट मनी देतात. मात्र, ग्रामीण भागातील कष्टकरी लोक मुलांना धड सकाळचा नाश्ताही देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

मात्र, आर्थिक नुकसान सोसून लष्कराच्या भाकऱ्या माध्यान्ह आहार पुरविणारे स्वयंसाहाय्य गट का म्हणून भाजतील? त्यासाठी त्यांनी दर वाढवून देण्याची मागणी शिक्षण खात्याकडे सातत्याने केली होती. मात्र, शिक्षण खाते वाऱ्याने कचरा जाण्याची वाट पाहात होते. माध्यान्ह आहारासाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारला आर्थिक मदत देते. मात्र, खर्चाचा काही वाटा राज्य सरकारला उचलावा लागतो.

शिक्षण क्षेत्रासाठी हा आर्थिक बोजा उचलणे हे सरकारचे दायित्व आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या गटांना दर वाढवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे दिवाळी सुट्टीनंतर सोमवारपासून विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, वाढलेली महागाई आणि केलेली दरवाढ यांचा ताळमेळ घालण्यात स्वयंसाहाय्य गट यशस्वी होणार का, हा प्रश्‍नच आहे.

काँग्रेसचे ‘वरातीमागून घोडे’

भाजपने ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली असली तरी स्वत:च्या उदासीन भूमिकेमुळे कॉंग्रेस नेते स्वत:हूनच भाजपची ही घोषणा खरी करणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याला कारण असे, की शुक्रवारी गुजरात विधानसभेचा बिगुल वाजला आणि भाजपच्या गोटात एकच घाई सुरू झाली, ती म्हणजे गुजरातच्या दिशेने कूच करण्याची.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष हे तिकडचे स्टार प्रचारक ठरले आणि अनेक नेत्यांनी प्रचारासाठी जाण्यासाठी बॅगाही भरल्या. हल्लीच काही वर्षांत राजकीय क्षेत्रात अवतरलेल्या आम आदमी पक्षानेही गुजरातच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. खरे तर गुजरातमध्ये भाजप, कॉंग्रेस आणि आप या तीन पक्षांतच चुरशीची लढत होणार आहे.

या निवडणुकीसाठी गोवा कॉंग्रेसकडून काहीच हालचाली सुरू दिसत नाहीत. कॉंग्रेसच्या गोटात शांतता आहे. त्यांचे नेते काहीच बोलत नाहीत. तिकडे कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते ‘भारत जोडो’ रॅलीत मग्न आहेत. त्यामुळे पुन्हा कॉंग्रेस आपल्या पायावर धोंडा मारून घेणार की काय, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सिल्वेराबाबांचा फॅमिली टाईम

सांत आंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे हल्लीच्या काळात राजकारणात तितकेसे सक्रिय दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत त्यांच्या गटाने बऱ्यापैकी बाजू मारल्याने सध्या ते निवांत झाले असावेत. खरे तर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सिल्वेराबाबांची कारकिर्द संपली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

परंतु त्यानंतर सिल्वेराबाब बऱ्यापैकी सावरले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर यंदा आपण कुटुंबासोबत वेळ घालवणार असल्याचे सिल्वेरबाबांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचे कळते. त्यामुळे सिल्वेराबाबांचा सध्या ‘फॅमिली टाईम’ सुरू झाला आहे. ‘नो पॉलिटिक्स, ओन्ली फॅमिली टाईम’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com