Goa Municipal Election Result 2021: भाजप उमेदवारांनी विरोधकांचा उडवला धुव्वा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

भाजप पुरस्कृत उमेदवारांनी विरोधकांचा धुव्वा उडवून विजयश्री खेचून आणली आहे.

पणजी: (Goa Municipal Election Result 2021 BJP candidates blow up opposition) सहा पालिकांपैकी कुंकळ्ळी वगळता तसेच पणजी महापालिकेत भाजप पुरस्कृत उमेदवार बहुमताने निवडून येत वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारांनी विरोधकांचा धुव्वा उडवून विजयश्री खेचून आणली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीपाठोपाठ भाजपने या स्वराज्य संस्थांवर आपला ठसा उमटवल्याने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यास सोपे झाले आहे. हे जरी सत्य असले तरी मुख्यमंत्रांचा मतदारसंघ असलेल्या साखळी पालिकेतील पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार पराभूत झाल्याने भाजपलाच धक्का बसला आहे.

या निवडणुकीनंतर सर्वत्र राज्यात साखळी पालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून भाजप पुरस्कृत व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील या पालिकेचा उमेदवार पराभूत झाला आहे. या पालिकेतील 13 पैकी भाजप पुरस्कृत व धर्मेश सगलानी गटाकडे प्रत्येकी 6 उमेदवार आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत कोणाचा उमेदवार बाजी मारतो हा चर्चेचा विषय ठरला होता. भाजप पुरस्कृत उमेदवार दशरथ ऊर्फ कृष्णा पंढरी आजगावकर (241) हा पराभतू झाला तर राजेंद्र रमेश आमशेकर (260) हा सगलानी गटाचे उमेदवार विजयी झाले. एकूण 584 मतदारांपैकी बहुमत मिळवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मतदाराना मुख्यमंत्री डॉ. सावंत हे अपयशी ठरल्याने हा राज्यभर चर्चेचा ठरला आहे. मुख्यमंत्री ही जागा निवडून आणू न शकल्याने त्यांच्या साखळी मतदारसंघातील वर्चस्वाबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. आज दिवसभर हीच चर्चा साखळीत तसेच गोवाभर सुरू होती. (Goa Municipal Election Result 2021 BJP candidates blow up opposition)

Goa Municipal Election Result 2021: कुंकळ्ळीच्या नगराध्यक्षपदी लक्ष्मण नाईक

पणजी महापालिकेत भाजप पुरस्कृत आमदार बाबुश मोन्सेरात यांचे टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलचे 25 सर्वपक्षीय पुरस्कृत आम्हा पणजीकार पॅनलचे 4 तर एकजण अपक्ष निवडून आला. मोन्सेरात यांनी 30 ही उमेदवार निवडून येईल असा केलेला दावा या निकालाने फोल ठरला आहे. सुरेंद्र फुर्तादो सातव्यांदा व त्यांच्या पत्नी रूथ फुर्तादो चौथ्यांदा हे दांपत्य लागोपाठ निवडून येण्याचा विक्रम केला आहे. फुर्तादो दांपत्याला आमदार मोन्सेरात यांनी प्रभाग फेररचना व आरक्षण बदलून त्यांना निवडणूक लढविणे कठीण केले तरी मोठ्या धैर्याने सामोरे जात त्यांनी मोन्सेरात यांची चाल त्यांच्यावरच उलटवून विजयी होत धक्का दिला. प्रभागातूनच नावच काढून टाकून त्यांना निवडणूक लढविण्यास न देण्याचे प्रयत्न झाले मात्र त्याविरुद्ध न्यायालयीन लढाई जिंकून प्रभाग 1 मधून नेल्सन काब्रालांनी मोन्सेरात गटाच्या उमेदवाराला धूळ चारळी. 

वाळपई पालिकेत भाजप पुरस्कृत मंत्री विश्‍वजित राणे यांचे पॅनलमधील 10 पैकी 9 जण विजयी झाले. एक अपक्ष विजयी झाला त्याने राणे यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. कुडचडे - काकोडा पालिकेत 15 पैकी 8 भाजप पुरस्कृत तर 7 अपक्ष निवडून येऊन बहुमत भाजपकडे असले तरी वीजमंत्री निलेश काब्राल यांना ही धोक्याची घंटा आहे. डिचोलीमध्ये 15 पैकी 9 जागा भाजप पुरस्कृत गटाला, शेट्ये बंधू गटाला 1, अपक्ष 1 तर नरेश सावळ यांच्या गटाचे ३ उमेदवार निवडून आले. काणकोण पालिकेत मात्र भाजप पुरस्कृत गटाचे पूर्ण पॅनलच निवडून आले.

विरोधकांना या ठिकाणी डोके वरज काढूच देण्यात आले नाही. त्यामुळे या काणकोण तालुक्यात भाजपचे वर्चस्व भक्कम असल्याचे दिसून आले. कुकंळ्ळीमध्ये काँग्रेसचे युरी आलेमांव यांच्या पॅनलने बाजी मारताना 14 पैकी 9 जण उमेदवार निवडून आले. भाजप पुरस्कृत गटाला 4 तर अपक्ष 1 उमेदवार निवडून आला. त्यामुळे कुंकळ्ळीत भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे. पेडणे पालिकेत 10 पैकी भाजप पुरस्कृत गटाचे 6 उमेदवार निवडून बहुमत मिळाले असले ते काठावरचे आहे. 2 अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे तर दोन मगो पुरस्कृत उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे पेडण्यातील मंत्री बाबू आजगावकर यांना हा मतदारसंघ भाजपकडेच राहावा यासाठी आतापासूनच तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज आहे. 

नावेली जिल्हा पंचायतमधील भाजप पुरस्कृत उमेदवार मतमोजणीनंतर शेवटच्या स्थानावर आला आहे. अपक्ष उमेदवार एडविन कार्दोज हे निवडून 2895 मतांनी निवडून आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार व महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो या दुसऱ्या स्थानावर येत 2523 मते मिळाली आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार माटिल्डा डिसिल्वा यांनी मुसंडी मारत 2428 मते मिळवली त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला ही हार पत्करावी लागली आहे. पंचायतीच्या 18 प्रभागांपैकी झालेल्या निवडणुकीत काहीअंशी भाजप पाठिंबा असलेले उमेदवार निवडून आले आहेत.

संबंधित बातम्या