Goa Municipal Elections 2021: कोरोना पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का घटणार?

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

राज्यातील म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे व सांगे या पाच पालिकांसाठी कोरोनाच्या सावटाखाली आज शुक्रवारी 23 रोजी मतदान होत असून 402 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

पणजी: राज्यातील म्हापसा, मुरगाव, मडगाव, केपे व सांगे या पाच पालिकांसाठी कोरोनाच्या सावटाखाली आज शुक्रवारी 23 रोजी मतदान होत असून 402 उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 ही एक तासाची वेळ गृह अलगीकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी मतदानासाठी ठेवण्यात आली आहे. ही निवडणूक जरी पक्षपातळीवर लढविली जात नसली, तरी काँग्रेस व भाजपप्रणीत उमेदवारांच्या पॅनलमध्ये सत्तेसाठी चढाओढ आहे. यामध्ये काही आजी व माजी आमदारांचे वर्चस्वही पणाला लागले आहे.  

या पाच पालिकांसाठी 402 उमेदवारांचे भवितव्य 1 लाख 85 हजार 225 मतदार ठरवणार आहेत. यामध्ये 91 हजार 519 पुरुष तर 93 हजार 706 महिला मतदार आहेत. या निवडणुकीसाठी 124 ठिकाणी 231 मतदान केंद्रे असून सर्वाधिक मडगाव व त्याच्या पाठोपाठ मुरगाव पालिकेत आहेत. या निवडणुकीसाठी 1790 कर्मचारी वर्ग वापरण्यात येत असून मुरगाव पालिकेच्या क्षेत्रात 18 ठिकाणे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्राच्या भागात अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असून मतदानानंतर संबंधित पालिकेच्या तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतपेट्या सीलबंद करून सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. 26 एप्रिलला मतमोजणी होणार असून त्या दिवशी सकाळी 8 वाजता त्या उघडण्यात येणार आहेत. 

मतदानाचा टक्का घटणार?
राज्यात मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने उद्या होणाऱ्या या मतदानावर मोठा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मडगाव व वास्को पालिकांमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. मडगावात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी एकत्रिपणे मडगाव पालिकेत भाजप प्रणीत माजी आमदार दामू नाईक यांच्या उमेदवारांच्या पॅनलसमोर आव्हान ठेवले आहे. केप्यातही उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी पालिकेवर भाजपप्रणीत उमेदवारांचे बहुमत येण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत तसेच अनेक आमिषेही दाखविली आहेत. मुरगाव पालिकेत बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी उभे केलेल्या पॅनलच्या उमेदवारांसोबत घरोघरी प्रचार केला आहे. या पालिकेत दाबोळी, वास्को व मुरगाव अशा तीन मतदारसंघातील काही प्रभागांचा समावेश असल्याने या मतदारसंघात भाजपचे आमदार 
आहेत.

मडगावात 1134 कोरोना मतदार 
ज्या पालिकांमध्ये निवडणूक आहेत त्या म्हापसा (546), मुरगाव (633), मडगाव (1134), केपे (109) व सांगे (96) कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आहेत. मडगावात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण मतदार आहेत त्यामुळे ते मतदान करणार की नाही यावरही पालिकेतील प्रभागांच्या निकालावर फरक पडू शकतो. या कोरोना रुग्णांना मतदानासाठी केंद्रावर येण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कोरोना किट्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

कडक पोलिस बंदोबस्‍त
राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढ असतानाही तसेच निवडणूक असलेल्या पालिकांमध्येही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे तरी ही निवडणूक होत आहे. कोविड - 19च्या पार्श्‍वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदान केंद्राच्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला येताना मास्कची सक्ती असून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी केंद्राच्या ठिकाणी मतदारांना उभे राहण्यासाठी आखणी करण्यात आली आहे. केंद्राच्या ठिकाणी सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपारी मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांची पथके रवाना झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन पोलिस कॉन्स्टेबल्सची सुरक्षा ठेवण्यात आली आहे.  मतदानाच्या दिवशी कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवार्चन निवडणूक व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची पथके तसेच भरारी पथके निवडणूक असलेल्या पालिकेच्या क्षेत्रात फिरतीवर असतील.

Goa municipal election 2021: मडगावात मतदानाला सुरवात 

संबंधित बातम्या