काणकोणात एकाही परदेशी पर्यटकाला कोरोनाची लागण नाही!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यामुळे काही पर्यटक काणकोणच्या किनारी भागात अडकून पडले होते. मात्र, या काळातही एकही परदेशी पर्यटक कोरोनाबाधित झाला नसल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार समजते.

काणकोण: काणकोणात आज पर्यंत २८३ कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. मात्र, मार्च ते आतापर्यंत एकही कोरोनाची लागण झालेला परदेशी पर्यटक सापडला नाही. याचे कोडे सर्वांनाच पडले आहे. पर्यटन मोसम संपण्यापूर्वीच कोरोनाचा संसर्ग गोव्यात सुरू झाला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यामुळे काही पर्यटक काणकोणच्या किनारी भागात अडकून पडले होते. साधारणपणे एप्रिल - मे महिन्यात त्यांना टप्प्याटप्प्याने मायदेशी जाण्याची सोय करण्यात आली. मात्र, या काळातही एकही परदेशी पर्यटक कोरोनाबाधित झाला नसल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार समजते.

सध्या अजूनही काही परदेशी पर्यटक काणकोणच्या किनारी भागात आहेत. काही पर्यटक मुखावरण न घालताच बाजारात फिरत असल्याचे चित्र दिसते. यासंदर्भात काणकोण आरोग्य केंद्राच्या सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा ती व्यक्ती कोरोना झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याशिवाय एन्टीजन तपासणी केली जात नाही. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर रुग्ण आरोग्य केंद्रात आल्यास त्याची लक्षणासबंधी खात्री केल्यानंतर ताबडतोब एन्टीजन तपासणी केली जाते. सरसकट तपासणी केली जात नसल्याची माहिती त्यांनी दिली.

काणकोणात नऊ रुग्ण
मंगळवारी काणकोणात कोरोनाची लागण झालेले पाच रुग्ण मिळाले. त्यापैकी भाटपाल, खोला, आगोंद, तळपण व देळे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सोमवारी काणकोणात कोरोनाची लागण झालेले चार रुग्ण सापडले. प्रत्येकी एक मणगण, तामने, भाटपाल खोला येथील आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या