नवीन वाहतूक कायद्याची तूर्त अंमलबजावणी नाही: वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, केंद्र सरकार वाहतूक कायद्यात नवीन नियम अंमलात आणणार असले, तरी गोव्यात वाहतूक कायद्याची ऑक्टोबर महिन्यात अंमलबजावणी करता येणार नाही. कारण वाढत्या कोरोना संक्रमणामुळे सर्व ती खबरदारी घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार.

दाबोळी: केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक कायद्याची तूर्त तरी ऑक्टोबर महिन्यात अंमलबजावणी करण्यात येणार नाही. याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बरोबर चर्चा करून पुढील वर्षी वाहतूक कायद्याचे नवीन नियम गोव्यात आणण्याचा विचार असल्याची माहिती दाबोळीचे आमदार तथा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

दाबोळी भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राबविलेल्या ‘सेवा सप्ताह’ समारोपच्या कार्यक्रमात वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी वरील माहिती दिली. 

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, बोगमाळो पंचायतीच्या सरपंच लॉरेन डिकुन्हा, पंच संकल्प महाले, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सुद, दक्षिण गोवा भाजप सचिव संतोष केरकर, चिखली कोमुनिदादचे रेमंड कार्व्हालो, समाजसेवक ब्रह्मानंद पवार, लिगोर मोंतेर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, केंद्र सरकार वाहतूक कायद्यात नवीन नियम अंमलात आणणार असले, तरी गोव्यात वाहतूक कायद्याची ऑक्टोबर महिन्यात अंमलबजावणी करता येणार नाही. कारण वाढत्या कोरोना संक्रमणामुळे सर्व ती खबरदारी घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर बैठक आयोजित करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार.  एकूणच राज्यातील वाहन चालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार आहे.

तसेच वाहतूक कायद्यात ऑक्टोबर महिन्यापासून सुरवात न करता जानेवारी २०२१ मध्ये गोव्यात लागू करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्‍या कल्याणासाठी कृषी विधेयकाला लोकसभेत व राज्यसभेत मान्यता देऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी योग्य पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलले आहे. देशाचा खरा कणा शेतकरी असून त्यांना त्याचा हक्क देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण केली असल्याची माहिती शेवटी वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी दिली. 

दाबोळी भाजप सेवा सप्ताह समारोप कार्यक्रम दाबोळी भागातील २७ दिव्यांगांना गरजू साहित्य मंत्री गुदिन्हो यांनी भेटवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश भोसले तर आभार प्रदर्शन अनिता थोरात यांनी केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या