पणजीत कोरोनाबाधितांची संख्या पोचली एक हजारावर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

दरदिवशी सरासरी ४० कोरोना संसर्ग रुग्ण सापडत आहेत तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात हे प्रमाण वाढत असून पणजी महापालिका क्षेत्रातील लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. 

पणजी: राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. त्यामध्ये राजधानी पणजीत त्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. पणजी भागातील कोरोना संसर्गाची संख्या ११४० वर पोहचली आहे. दरदिवशी सरासरी ४० कोरोना संसर्ग रुग्ण सापडत आहेत तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात हे प्रमाण वाढत असून पणजी महापालिका क्षेत्रातील लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. 

पणजी महापालिका क्षेत्रातील सांतिनेझ बांध व आल्तिनो येथील झोपडपट्टी या परिसरातून कोरोना संसर्गाची सुरुवात झाली व ती त्यानंतर झपाट्याने वाढतच गेली. महापौर उदय मडकईकर यांनी या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेथील परिसर तसेच इमारतींमध्ये निर्जतुकीकरण करण्याचा धडाका लावला. हा संसर्ग इतरांपर्यंत पोहचू नये यासाठी ते स्वतः नजर ठेवून असले तरी लोक आवश्‍यक असलेली काळजी घेत नसल्याने हे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत गेले आहे. 

महापौर मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी परिसरात जून महिन्यापासून कोरोना बाधित रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात तर हे प्रमाण २९६ वर पोहचले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात चते ३४४ वर पोहचले. सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात ही संख्या ५०४ वर पोहचली आहे. कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे त्यातील बहुतेक जण हे साठ वर्षांवरील आहेत. पणजीत सध्या ३६४ सक्रीय कोरोना संसर्ग रुग्ण आहेत. त्यातील ८० टक्के रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत. पणजीत हा संसर्ग फैलावत असल्याने नागरी आरोग्य केंद्रात कोविड चाचणी करून घेण्यासाठी दरदिवशी लांब रांगा लागत आहेत. या चाचणीतून सरासरी ४० जण कोरोना बाधित सापडत आहेत. काहींना संसर्गाची काहीच लक्षणे नसली तरी त्यांचा कोरोना बाधित रुग्णाशी संपर्क आल्याने ही चाचणी पोझिटिव्ह येत आहे. त्यामुळे ज्यांना काहीच लक्षणे नाहीत त्यांच्या मनातही स्वतःला संसर्ग झाल्याची शंका निर्माण होऊन भीती वाटू लागली आहे. या भीतीनेच अनेकजण खचून गेले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना काहीच लक्षणे नाहीत मात्र कोरोना संसर्गाची लागण झाल्याची मनात शंका आहे असे लोक आरोग्य केंद्रावर गेल्यास त्यांची चाचणी केली जात नाही. एखाद्याला ताप किंवा खोकला अशी लक्षणे असल्याशिवाय ही चाचणी करण्यास आरोग्य केंद्रावरील डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला नाही याची खात्री करून घेण्यासाठी खासगी इस्पितळात  चाचणी करून घेण्यासाठी पदरमोड करण्याची पाळी येत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या