सीमा खुल्या केल्याने राज्यात पर्यटक येणे सुरू

प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, सीमा खुल्या करण्याच्या आदेशानंतर आज (बुधवारी) पत्रादेवी तपासणी नाक्यावरुन गोव्याच्या हद्दीत सकाळपासून संध्याकाळपर्यत देशी पर्यटकांची सुमारे साठ ते पासष्ट वाहनांनी गोव्यात प्रवेश केला.

पेडणे: केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, सीमा खुल्या करण्याच्या आदेशानंतर आज (बुधवारी) पत्रादेवी तपासणी नाक्यावरुन गोव्याच्या हद्दीत सकाळपासून संध्याकाळपर्यत देशी पर्यटकांची सुमारे साठ ते पासष्ट वाहनांनी गोव्यात प्रवेश केला. येत्या काही दिवसांत पर्यटक येण्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्यानंतर सकाळपासून पर्यटक टेम्पो ट्रॅव्हेलर्स, खासगी मोटर कार व टॅक्सीद्वारे येत होते. काही वाहनांवरती बॅगा तसेच समुद्रात मजा मौज करण्याचे साहित्य वगैरे दिसत होते. म्हणजेच पर्यटक मजामौज करण्यासाठीच्या उद्देशानेच येत असल्याचे जाणवत होते. मात्र, या पर्यटकांची वाहने तुरळकपणे दिवसभर येत होती. राज्याच्या सीमा खुल्या केल्यानंतर सगळे निर्बंध रद्द केल्यानंतर येथे ठेवण्यात आलेला पोलिस पहारा, वाहनांची नोंद करून घेणारे कर्मचारी, थर्मल गन लावून शारीरिक तपासणी करणारे असे कोणीही नसल्याने पर्यटकांची वाहने तपासणीसाठी न थांबता सरळ जात होती. यामुळे पर्यटक कुठून आले. त्यांचे मोबाईल फोन क्रमांक, ते कुठे जाणार, किती दिवसांनी परतणार, त्यांचे शारीरिक तापमान वैगेरेच्या नोंदीमुळे जी माहिती मिळत असे ती आता मिळणार नाही. राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे कोरोना महामारी आणखीन वेगाने फैलावेल, अशी लोकांत भीती व्यक्त होत आहे.  

राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे कोरोना महामारीचा आणखीन वेगात प्रसार होईल, अशी भीती स्थानीक व गोमंतकीयांत व्यक्त केली जात आहे. पण, योग्य आवश्यक उपाययोजना करून सावधगिरी बाळगली तर ह्या सांसर्गिक रोगाला दूर ठेवता येते, हे पेडणे पोलिसांनी दाखवून दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी, नयबाग, किरणपाणी या तपासणी नाक्याबरोबरच पत्रादेवी येथील दुसऱ्या बाजूचा रस्ता, हणखणे, हेदूस हाळी, पोरस्कडे कोकण रेल्वे पूल येथे रात्रंदिवस चौवीस तास सुमारे पेडणे पोलिस ठाण्यातील सुमारे चाळीस अधिकारी व पोलिस पहारा करायाचे. परराज्यातून येणाऱ्या वाहन व त्यातील वाहक व अन्य व्यक्तींपासून संसर्ग होण्याची पत्रादेवी तपासणी नाक्यावर ड्युटी करणाऱ्यांना भीती होती. पण, सरकारी तत्त्वांचा काटेकोरपणे अवलंब केल्याने या ठिकाणी साडे पाच महिने काम करूनही एकाही पोलिस अधिकारी किंवा शिपायाला कोरोनाची लागण होऊ शकली नाही, हे विशेष.

संबंधित बातम्या