परराज्यातील वाहनांचा गोव्यात मुक्त प्रवास सुरू

प्रतिनिधी
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले साडेपाच महिने बंद करण्यात आलेल्या राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्यानंतर राज्याच्या पलिकडून सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातील लोक आता वाहनाद्वारे गोव्यात येऊ लागले आहेत

पेडणे:  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले साडेपाच महिने बंद करण्यात आलेल्या राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्यानंतर राज्याच्या पलिकडून सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातील लोक आता वाहनाद्वारे गोव्यात येऊ लागले आहेत. त्यात नोकरी, व्यवसाय तसेच देशी पर्यटकांचा समावेश आहे. मात्र महाराष्ट्राच्या एसटी बसगाड्या अजून येण्यास सुरवात झालेली नाही, तर अद्याप कदंब बस गाड्याही महाराष्ट्रात गेलेल्या नाहीत. 

राज्यातील विविध भागातील औद्योगिक वसाहतीत सिंधुदूर्गमधील युवक युवती मोठ्या प्रमाणात आहेत. मालवण-वेंगुर्लापासून असे अनेक युवक वेर्णा, कुंडई इतक्या लांब पल्याच्या अंतरापासून करासवाडा, तुये औद्योगिक वसाहती तसेच अन्य खासगी वैगेरे आस्थापनात नोकरी व्यवसायाला एका दुचाकीवरून दोघे दोघे जण येतात. 

‘कोरोना’मुळे राज्याच्या सीमा बंद केल्याने त्यांना गोव्याच्या हद्दीत प्रवेश करणे शक्य होत नसल्याने सिंधुदुर्गमधील हजारो युवकावर घरी बेकार रहाण्याची वेळ आली होती. आता असे युवक पूर्वीप्रमाणे रोज सकाळी गोव्यात पत्रादेवी, नयबाग, किरणपाणी आदी मार्गे नोकरीला येऊ लागले आहेत. सिंधुदूर्गमधील मालवण वेंगुर्ला, शिरोडा येथील मासळी मोठ्या प्रमाणात पेडणे व म्हापसा मासळी मार्केटमध्ये विक्रीसाठी यायची. टाळेबंदीच्या काळात मासे विक्रीत्या महिला व पुरुष येणे बंद झाले होते. आता मासळी विक्रीते पेडणे व म्हापसा मासळी बाजारात येऊ लागले आहेत. पेडणे मासळी मार्केटमध्ये आता पूर्वीप्रमाणे सिंधुदूर्गमधील बऱ्याच मासळी विक्रीत्या महिला सीमा खुल्या केल्यानंतर परत दिसू लागल्या आहेत. पेडणे बाजारात गावठी भाजीपाला घेऊन येणाऱ्या सिंधुदुर्गमधील महिल व पुरुषांची संख्या तशी बरीच आहे. तेथील असे भाजी, फळ व फूल विक्रीते खुल्या केलेल्या सीमावरील तपासणी नाक्यातून पेडणे बाजाराला येऊ लागले आहेत. 

देशी पर्यटकही येण्यास प्रारंभ झाला आहे. तर बांदा व आरोंदा बाजारपेठेत गोव्यातील लोक जाऊ लागले आहेत. राज्याच्या सीमा खुल्या केल्यानंतर आता या तपासणी नाक्यावर वाहनांची नोंदणी, मोबाईल फोन क्रमांक नोंदणी, थर्मल गनद्वारे शरीराचे तापमान ह्या प्रक्रिया बंद झाल्याने सगळ्या प्रकारच्या वाहनांना या सर्व तपासणी नाक्यावर वाहने न थांबविता सरळ गोव्यात प्रवेश करता येणे परराज्यातील सर्वांना शक्य झाले आहे.

संबंधित बातम्या