Goa Latest News: 'सिनेमा ही तंत्रज्ञानाने जन्माला घातलेली कला' - विनोद गणात्रा

Goa Latest News: कलात्‍मक, सृजनात्‍मक निर्मितीवर भर हवा
Vinod Ganatra |Goa News
Vinod Ganatra |Goa NewsDainik Gomantak

Vinod Ganatra: सिनेमा ही तंत्रज्ञानाने जन्माला घातलेली कला आहे. या क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग आणि बदल होत असतात. त्यामुळे प्रत्येक पुढच्या पिढीतील सिनेकर्मींना सिनेनिर्मिती सोपी होऊन जाते.

असे असले, तरी सिनेमा ही कलात्मक, सृजनात्मक निर्मिती देखील आहे हे विसरता कामा नये आणि त्यामुळेच नव्या सिनेकर्मींनी तंत्रज्ञानाची कास धरताना कलात्मक बाजूदेखील तेवढीच सक्षमपणे सांभाळली पाहिजे. केवळ तंत्रज्ञानशरण सिनेनिर्मिती होता कामा नये, असे स्वच्छ मत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि यावर्षीच्या इफ्फी - इंडियन पॅनोरमाचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी ‘गोमन्तक’कडे व्यक्त केले.

सुरवातीच्या काळात रोलवर सिनेमा चित्रित होत होते. त्यामुळे सिनेकर्मी आपल्या कलाकृतीबद्दल अधिक सजग होते. सिनेमाच्या पटकथेवर खूप अभ्यासपूर्ण काम होत असे. सिनेमात डिजिटल युग अवतरल्यानंतरही हा अभ्यास तसाच राहणे अपेक्षित होता आणि कथेच्या अनुषंगाने अधिक सकस सिनेमा प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे होते, पण अपवाद वगळता बहुतांश तरुण सिनेकर्मी तंत्रज्ञानासमोर शरणागती पत्करताना दिसत आहेत.

विचार करून, पटकथेवर अभ्यास करून गरजेपुरतेच चित्रीकरण करण्यापेक्षा डिजिटल कॅमेरा असल्याने भरमसाट चित्रीकरण करतात आणि त्यामुळे संकलनावर त्याचा ताण तर येतोच, शिवाय त्याचवेळी ही संपूर्ण प्रक्रिया दिग्दर्शकाचा सिनेमाबद्दलचा दृष्टिकोन अप्रत्यक्षरीत्या दाखवत असते, असेही थेट निरीक्षण विनोद गणात्रा यांनी यावेळी नोंदवले.

‘छोट्या भाषेतील सिनेमांना मिळावा लोकाश्रय’

भारत हा बहुभाषिक बहुप्रांतीक आणि बहुविध संस्कृतीने नटलेला देश आहे. आपल्याकडे विविध भाषांमधून मोठ्या प्रमाणात सिनेनिर्मिती सध्या सुरू आहे. या सिनेमांना आपण सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे.

Vinod Ganatra |Goa News
Subhash Desai On IIT Project: आयआयटी प्रकल्प सांगे येथेच करण्यासाठी सरकारचा अट्टहास

विविध छोट्या छोट्या भाषांमध्ये जे सिनेमाचे प्रयत्न होत आहेत त्यांच्या मागे प्रेक्षकांनी सक्षमपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. देशातील प्रत्येक भाषेमध्ये सिनेमा व्हावा, प्रत्येक भाषेला सिनेमाच्या पडद्यावर स्वतःचे स्थान मिळावे यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

"गोव्यातील कोकणी सिनेमा हा आशयघन आहे. यावर्षी गोवन विभागाचे परीक्षण देखील आम्ही केले होते. छोट्या छोट्या विषयावरती अत्यंत चांगले प्रयत्न गोव्यातल्या या नव्या लघुपटकारांनी केलेले आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना सरकारने आणि प्रेक्षकांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे."

- विनोद गणात्रा, अध्यक्ष, इंडियन पॅनल परीक्षक मंडळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com