Goa IFFI 53 Updates: 'गोव्यात 2025 पर्यंत साकारणार इफ्फी भवन'- प्रमोद सावंत

IFFI 2022 awards: मनोज वाजपेयी, सुनील शेट्टी, अजय देवगण, परेश रावल, विजेंद्र प्रसाद यांचा सन्मान
Goa IFFI 53 Updates|Goa News
Goa IFFI 53 Updates|Goa NewsDainik Gomantak

53rd IFFI 2022: गोव्याला देशाचा सिनेहब करतानाच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाहिलेले ‘इफ्फी’भवनचे स्वप्नदेखील लवकरच पूर्ण करू. 2025 सालापासून ‘इफ्फी’ स्वत:च्या जागेत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ताळगाव येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि गोवा मनोरंजन सोसायटीने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी जगभरातील 79 देशांतील 280 सिनेमे इफ्फीमध्ये दाखवले जाणार आहेत.

यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री बी. एल. मुरुगन, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, वाणी त्रिपाठी, ए. के. बीर, राज्य सचिव पुनित गोयल आदींसह अभिनेते परेश रावल, मनोज वाजपेयी, अजय देवगण, सुनील शेट्टी, वरूण धवन, सारा अली खान, कार्तिक आर्यन आदी कलाकार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की, देश-विदेशातील सिनेकर्मींना गोव्याने नेहमीच आकर्षित केले आहे. मुंबईनंतर देशातील सर्वाधिक सिनेशूटिंग गोव्यामध्ये होते. भविष्यात गोव्यातील सिनेशूटिंगची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून सिनेनिर्मितीपश्चात कामांसाठीही सिनेकर्मींनी गोव्यात यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल पटकथा लेखक बी. विजेंद्र प्रसाद, अभिनेते परेश रावल, मनोज वाजपेयी, अजय देवगण, सुनील शेट्टी यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उदघाटन समारंभानंतर देशभरातील प्रसिध्द कलाकारांचा समावेश असलेल्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन अभिनेता अपारशक्ती खुराणा आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांनी केले.

गोव्यात लवकरच ‘फिल्म स्कूल’

राज्यात सिनेसंस्कृती मोठ्या प्रमाणात जोपासली जात असून, इफ्फीमध्ये दरवर्षी गोंयकारांचा वाढता सहभाग हे याचेच द्योतक आहे. त्यामुळे नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच सिने क्षेत्रातील विविध कला शिकवण्यासाठी राज्यामध्ये लवकरच ‘फिल्म स्कूल’देखील सुरू करण्यावर विचार होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

कार्लोस सौरा यांना ‘जीवन गौरव’ प्रदान

स्पेनमधील प्रसिध्द छायादिग्दर्शक तथा सिनेदिग्दर्शक कार्लोस सौरा यांना यावर्षीचा सत्यजीत रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे 93 वर्षीय कार्लोस सौरा यांना गोव्यामध्ये येता आले नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने कन्या अ‍ॅना सौरा यांनी हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वीकारला.

Goa IFFI 53 Updates|Goa News
IFFI 21 Nov Schedule: दृश्यम-2, RRR, इंडिया लॉकडाऊनसह सोमवारी इफ्फीत विविध चित्रपटांची मेजवानी

‘मेगास्टार’ चिरंजीवी ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’

यावेळी प्रसिध्द तेलुगू - हिंदी अभिनेते ‘मेगास्टार’ चिरंजीवी यांना यावर्षीचा ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार वहिदा रेहमान, रजनीकांत, इलैयाराजा, एस. पी. बालसुब्रह्मण्यम, अमिताभ बच्चन, सलीम खान, बिस्वजित चॅटर्जी, हेमा मालिनी आणि प्रसून जोशी आदींना प्रदान करण्यात आला आहे.

"यावर्षी गोवन विभाग तयार केला आहे. यासाठी इंडियन पॅनोरमाच्या निवड समितीच्या तीन सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष निवड समितीने सहा लघुपट आणि एक माहितीपट निवडला आहे. फेस्टिव्हल माईल, एंटरटेनमेंट झोन आणि हेरिटेज परेड यांसारखे उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देश विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत नेतृत्व प्रस्थापित करत आहे. देशाच्या शतक महोत्सवी वर्षामध्ये भारत हा जगातील सिनेमाचे केंद्रस्थान बनून ‘सिनेविश्वगुरू’ व्हावा."

- अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com