
मोरजी : मोरजी पंचायतीच्या निवडणुकीत ‘जिंकू किंवा मरू’ अशा इर्षेने अनेक आजी-माजी सरपंच, पंचसदस्य रिंगणात आहेत. निवडणून येण्यासाठी मतदारांना आमिषे दाखविली जात आहेत. प्रभाग 1 ते 3 प्रतिष्ठेचे ठरले आहेत. या पंचायत क्षेत्रात एकूण 6103 मतदार असून एकूण नऊ प्रभागांतून 32 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यात तीन माजी सरपंचांचा समावेश आहे. जितेंद्र शेटगावकर, मंदार पोके, वैशाली शेटगावकर यांच्यासह आग्नेल डिसोझा, उमेश गडेकर, संपदा सतीश शेटगावकर, पवन मोरजे, विलास मोरजे व सुप्रिया पोके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
प्रभाग क्रमांक एकमधून तब्बल नऊ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात माजी सरपंच जितेंद्र शेटगावकर यांच्यासह माजी पंच विलास मोरजे, संपदा शेटगावकर व आग्नेल डिसोझा यांचा समावेश आहे. प्रभाग 9 मधून आग्नेल डिसोझा, आल्बर्ट मास्कारेन्हस, अर्जुन शेटगावकर, मारिया फर्नांडिस, जितेंद्र शेटगावकर, न्हानू शेटगावकर, संपदा शेटगावकर, वीणा मालवणकर आणि विलास मोरजे हे रिंगणात आहेत. मागच्या वेळी विलास मोरजे विजयी झाले होते.
प्रभाग 3 वरही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हा प्रभाग माजी सरपंच वैशाली शेटगावकर यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी स्वप्निल सुहास शेटगावकर हा नवखा उमेदवार उभा ठाकला आहे. प्रभाग 4 हा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आहे. माजी पंच उमेश गडेकर, प्रशांत खर्बे, जोश कलिस्तो, भिकाजी गोवेकर हे चार उमेदवार तेथे रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत उमेश गडेकर हे विजयी झाले होते. प्रभाग 5 मधून मंदार पोके हे माजी सरपंच रिंगणात असून त्यांना टक्कर देण्यासाठी सागर पोके आणि समीर वाडजी हेही रिंगणात आहेत.
प्रभाग 6 मधून गत निवडणुकीत प्रकाश शिरोडकर हे निवडून आले होते. परंतु यावेळी महिलांसाठी हा प्रभाग आरक्षित असल्यामुळे त्यांनी आपली पत्नी रजनी शिरोडकर यांना पुढे केले आहे. भक्ती तेमकर यांच्याशी त्यांची सरळ लढत होईल. प्रभाग 7 मधून पवन मोरजे निवडून आले होते. यंदा त्यांच्यासमोर कृष्णा पेडणेकर, सतीश मोरजे, वीरजिनिया फर्नांडिस यांचे आव्हान आहे. प्रभाग आठमधून संपदा शेटगावकर, फटू शेटगावकर, राजेश शेटगावकर आणि रुमाल्डो फर्नांडिस रिंगणात आहेत. प्रभाग 9 मधून गेल्या निवडणुकीत तुषार शेटगावकर विजयी झाले होते. यंदा हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित असल्याने स्नेहा दत्तप्रसाद तिळोजी आणि सुप्रिया पोके या दोघींमध्ये सरळ लढत होणार आहे.
जाऊबाई विरोधात जाऊबाई
प्रभाग 2 हा प्रतिष्ठेचा मानला जात आहे. येथून गत निवडणुकीत अमित शेटगावकर यांनी बाजी मारून ते उपसरपंच बनले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित केल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जागेवर पत्नी सुरेखा शेटगावकर यांना पुढे केले आहे. त्याची भावजय वंदना रामनाथ शेटगावकर व अनू आनंद शेटगावकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे येथे जाऊबाई विरुद्ध जाऊबाई अशी लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.