पंचायत निवडणुकीत बोरीमध्ये शह-काटशहाचे राजकारण!

अनेकांचा पत्ता कट : नव्‍या चेहऱ्यांना संधी मिळण्‍याची अधिक शक्‍यता
Panchayat Election
Panchayat ElectionDainik Gomantak

फोंडा : बोरी ही फोंडा तालुक्यातील नव्याने उभारी घेणारी पंचायत. मडगाव-फोंडा हमरस्त्यावर असल्यामुळे या पंचायतीस एक नवीन खुमारी प्राप्त झाली आहे. त्यात परत टॉप-कोला ते सिद्धनाथ पर्वतापर्यंत अनेक टुमदार बंगले व सदनिकांचे जाळे पसरले गेल्यामुळे बोरी पंचायतीला एक वेगळाच साज चढायला लागला आहे. पण म्हणून समस्या सुटल्या बाहेत अशातला भाग नाही.

फोंडा-मडगाव हमरस्त्यावर दोन्हीही बाजूंनी इमारती वा शेती असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. इतर ठिकाणी रस्त्यांचे रूंदीकरण होत असताना इथे मात्र कोणीही लक्ष देताना दिसत नाही. मंत्री सुभाष शिरोडकर हे या भागाचे आमदार. तब्बल आठ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सुरूवातीला ते काँग्रेसमध्ये असताना बोरी पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. पण आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे या पंचायतीत भाजप मी म्हणताना दिसत आहे. असे असले तरी इथे भाजपचेच दोन गट वावरताना दिसताहेत. एक सुभाष भाऊंना शह देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तर दुसरा गट त्‍यांच्‍या बाजूने वावरताना दिसत आहे.

माजी सरपंच सुनील सावकर हे याचे प्रमुख उदाहरण. सुनील नेहमीच सुभाष शिरोडकर यांच्या बाजूने राहिले. शिरोडकर जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा सावकर काँग्रेसमध्ये सक्रीय सदस्य होते. शिरोडकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारल्यानंतर तेही भाजपमध्ये आले. पण यावेळी त्यांचा प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. या प्रभागात इतर मागासवर्गीय संख्येने कमी असूनसुद्धा हा प्रभाग आरक्षित ठेवला हे विशेष. एवढेच नव्हे तर ज्या भागात सुनील सावकर राहतात, तोही प्रभाग आरक्षित केला आहे. सुनील सावकार यांच्‍याबरोबरच प्रशासक नेमण्यापूर्वी सरपंच असलेल्या ज्योती मुकेश नाईक मागच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले पंच तुकाराम बोरकर हेसुद्धा रिंगणात नाहीत.

प्रभाग 11 मधून रिंगणात उतरलेल्या माजी सरपंच नूतन नाईक व पंच विनय पारपती यांचा अपवाद वगळता बहुतेक चेहरे हे नवीनच आहेत. या प्रभागात नूतन नाईक व शिवानंद गावकर हेही रिंगणात आहेत. तरीही एकंदरीत चित्र पाहता बोरी पंचायतीला नवीन चेहरा लाभणार हे निश्‍चित आहे.

Panchayat Election
पणजी महानगरपालिकेकडून रस्ता दुरुस्तीची कामे

भाजपच्या कोपरा बैठका सुरू असून त्यांचे समर्थक काही उमेदवार अपात्र ठरले असले तरी ‘तू नही और सही’ या तत्त्वावर त्यांनी लगेच राखीव उमेदवारांना रिंगणात उतरविल्‍याचे दिसत आहे. मंत्री सुभाष शिरोडकर हे प्रत्यक्ष वावरत नसले तरी त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे कळते. पण एकाच प्रभागात तिघे तिघे आपण शिरोडकर यांचेच उमेदवार म्हणून सांगत असल्यामुळे मतदारही बुचकाळ्यात पडले आहेत. ‘कौन अपना और कौन पराया’ या रहस्याचा भेद मात्र सुभाष भाऊच करु शकतात.

काँग्रेस, मगोच्‍या गोटात सामसूम

रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍सही (आरजी) रिंगणात असून या पक्षाला विधानसभेसारखा पाठिंबा मिळतो का, हे बघावे लागेल. काँग्रेसच्या गोटात मात्र सामसून दिसते आहे. तसे पाहता सुभाष शिरोडकरांच्‍या बर्हिगमनानंतर या पंचायतीत काँग्रेसचे नामोनिशाण शिल्लक राहिलेले दिसत नाही. मगो पक्षही थंड पडल्यासारखा झाला आहे. एकंदरीत 42 उमेदवारांतून कोण किनारा गाठतो आणि कोण बुडतो याचे उत्तर 12 ऑगस्ट रोजीच मिळू शकेल हे निश्‍चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com