पणजी: राज्यातील एकूण १९१ पंचायतींपैकी १७७ पंचायतींनी आता त्यांचा कारभार ऑनलाईन पद्धतीने हाताळणे सुरू केले असून या सर्व पंचायतींच्या आता स्वतःच्या स्वतंत्र वेबसाईट कार्यरत आहेत.
राज्यातील सर्व पंचायतींपैकी आता केवळ १२ पंचायतींमध्ये ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झालेली नाही आणि या १२ पंचायती ही प्रणाली सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत. याविषयी खुद्द एका पंचायत अधिकाऱ्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. "आतापर्यंत तरी आपण संपूर्ण देशभराचा विचार केला, तर असे कुठलेही राज्य नाही जिथे प्रत्येक पंचायतीसाठी वेगळी स्वतंत्र वेबसाईट कार्यरत असेल. मोठ्या राज्यांमध्ये पंचायतींची संख्या हजारोंच्या घरात जाते. कनेक्टिव्हिटी आणि फारच आतल्या भागातील क्षेत्रे असल्यामुळे या पंचायतींना ऑनलाईन कार्यप्रणाली चालविणे फारच कठीण होऊन बसते" असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. राज्यातील पंचायतींच्या प्रशासकीय कामकाजासाठी वेबसाईटचे राहिलेले काम पूर्ण झाले की ऑनलाईन सेवा डिजिटल स्वरूपात दिल्या जाणार आहेत. सर्व प्रकारचे अर्ज घरच्या घरीच डाउनलोड करून, पूर्णपणे भरल्यावर पंचायतींमध्ये सुपूर्द करणे सोपे होणार आहे. या वेबसाईटींवर आर्थिक व्यवहारांसाठी ‘पेमेंट गेटवे'' अशी सोय देण्याचा पर्यायही विचाराधीन असून नियोजनात आहे जेणेकरून नागरिकांना गृहकर आणि विजेचा कर ऑनलाईन भरता येणार आहे.
गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीतून भाजप सरकारच्या नेतृत्वावर जनतेने दाखवला विश्वास -
जन्मदाखला आणि मृत्यू दाखला वेबसाईटच्या आधारे जारी करण्याचा पर्यायही लवकरच प्रत्यक्षात आणला जाणार असून त्यादृष्टीनेही प्रक्रिया सुरू आहे. "प्रत्येक पंचायतीमध्ये १९७१ पासून जन्माला आलेल्या व्यक्तींचे जन्मदाखले नोंदणीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत आणि सध्या रहिवाशांनी पंचायतींमध्ये जन्मदाखल्यांसाठी व्यक्तिशः भेट दिल्यास त्या पंचायतींमध्ये चिटणीस वा सचिव पदावर कार्यरत असलेली अधिकारी व्यक्ती एक नावापुरती प्रत जारी करते, ज्यामुळे तिचा उपयोग वा वापर संबंधित कामासाठी दस्तऐवज म्हणून करता येऊ शकतो. या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम थोडेसे आरामदायी होणार आहे. येणाऱ्या काळात ऑनलाईन सुविधेमुळे लोकांना ऑनलाईन जाऊन अर्ज डाउनलोड करता येईल, जन्म वा मृत्यूचा अहवाल स्कॅन करता येईल आणि ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर तो पुन्हा पंचायतीकडे पाठविता येणार आहे" असे अधिकाऱ्याने म्हटले.
ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात अजून सुरुवात न केलेल्या पंचायतींमध्ये तिसवाडी तालुक्यातील ताळगाव, आजोशी - मंडूर, चोडण (माडेल), खोर्ली, कुंभारजुवा, गोवा वेल्हा, साओ माथायस, सांता क्रूझ, सान्त इस्तेव या पंचायतीचा समावेश आहे. केपे तालुक्यातील आवेडे - कोठम्बी तर बार्देश तालुक्यातील पिर्ण आणि थिवी येथील पंचायतीही ऑनलाईन प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करणे अजून बाकी आहेत.
आणखी वाचा:
दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीत राजकीय नेत्यांचे वजन वाढले! -