शहराविषयी नगरसेवकांना खरोखरच कळवळा आहे का?; महापालिकेची मासिक सभा घेण्यास विरोध

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

बाजार समितीने मार्केटमधील दुकानांच्या भाडेकराराविषयीचा निर्णय व स्थायी समितीने घेतलेल्या काही निर्णयावर ठराव घेणे महत्त्वाचे होते. त्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणे गरजेचे होते. परंतु त्यासाठी बहुतांश नगरसेवक इच्छुक नाहीत, असे दिसत आहे.

पणजी: पणजी अर्थसंकल्पीय सभेनंतर एकही सर्वसाधारण सभा झालेली नाही. काही अपवादात्मक नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांकडून सभा घेण्यास नकार येत आहे. त्यामुळे शहराविषयी या नगरसेवकांना खरोखरच कळवळा आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

महापौर म्हणून पुन्हा पदभार स्वीकारलेल्या उदय मडकईकर यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडण्यासाठी बैठक घेतली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांत जनता संचारबंदी आणि त्यानंतर टाळेबंदी लागू झाली. एप्रिल ते ऑगस्ट अशा पाच महिन्यांत केवळ महापालिकेच्या बाजार समितीची आणि स्थायी समितीची बैठक पार पडली. 

बाजार समितीने मार्केटमधील दुकानांच्या भाडेकराराविषयीचा निर्णय व स्थायी समितीने घेतलेल्या काही निर्णयावर ठराव घेणे महत्त्वाचे होते. त्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणे गरजेचे होते. परंतु त्यासाठी बहुतांश नगरसेवक इच्छुक नाहीत, असे दिसत आहे. महापौर मडकईकर यांनी नगरसेवकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सभा घेण्याविषयी विचारणा केली होती. परंतु अनेकांनी कोरोनाचे कारण सांगत सभा नको असे सांगत विरोध दर्शविला होता.

एका बाजूला काही दिवसांपूर्वी मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक सामाजिक अंतर राखत सभा घेतात. तर दुसरीकडे राज्यातील एकमेव महापालिका असलेले नगरसेवक सभा घेऊ नका असे सांगतात, यावरून या नगरसेवकांना खरोखरच शहराचे आणि पर्यायी पणजीतील नागरिकांचे काही पडले आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

सभेला विरोध करून नगरसेवकांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे, असे दिसते. महापालिकेत हाताच्या बोटावर मोजण्याएवढे नगरसेवक येतात. मध्यंतरी केंद्रीय आयुष मंत्र्यांनी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्या नगरसेवकांना वाटपासाठी दिल्या त्या दिवशी काही नगरसेवक उपस्थित राहिले होते. परंतु सध्याच्या घडीचा विचार केला तर महापौर मडकईकर नियमित, तर  बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर, नगरसेवक रुपेश हळर्णकर, प्रमेय माईणकर हे नगरसेवक आठवड्यातून महापालिकेत चार-पाचवेळा येतात. महापालिकेची सर्वसाधारण सभा घ्यावी म्हणून नगरसेवक हळर्णकर आणि डेगवेकर यांनी महापौरांकडे मागणी केली. दरम्यान, सर्वसाधारण सभा कधी होणार, याविषयी विचारणा केली असता महापौर मडकईकर म्हणाले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही सभा घेण्यात येईल, त्याची सूचना ऑक्टोबरच्या प्रारंभी एक- दोन दिवसांत काढली जाईल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या