कारवार ते पेडण्यापर्यंत रेल कार सेवा सुरू करा; प्रवाशी, चाकरमान्यांची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारकडून लोकल रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी अद्याप निर्देश नाहीत. तसे निर्देश आल्यास १५ सप्टेंबरनंतर रेलकार सुरू करण्यासबंधी विचार करण्यात येणार आहे. सध्या मुंबईमधील लोकल रेलसेवाही बंद आहे. कारवार ते पेडणेपर्यंतची रेलकार सेवाही लोकल रेल्वे सेवेमध्ये येते. - बबन घाटगे, कोकण रेल्वेचे उपव्यवस्थापकीय संचालक

काणकोण: कोकण रेल्वेची कारवार व गोव्यातील चाकरमान्यांना सोयीस्कर ठरलेली रेल कार सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मार्च महिन्यात ही सेवा बंद करण्यात आली होती. आता सहा महिन्यानंतर सीमा खुल्या झाल्या. 

आंतरराज्य प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र, कोकण रेल्वेने रेल कार सेवा सुरू केली नसल्याने नियमीत कारवारच्या वेगवेगळ्या भागातून तसेच दक्षिण गोव्यातून कामानिमित्ताने वेर्णा, मडगाव, पणजी म्हापसा व अन्य भागात जाणाऱ्या चाकरमान्यांची व प्रवाशांची गैरसोय होत आहे. 

या कार रेल्वाचा सर्वाधिक फायदा कारवारमधून वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या युवा कामगारांना होत होता. कारखाने सुरू झाले. मात्र, रेलसेवा सुरू न झाल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रेलसेवा नाही त्याचप्रमाणे खासगी मिनी प्रवासी गाड्याही बंद आहेत. कदंब महामंडळाच्या गाड्यांसाठी दोन दोन तास ताटकळत प्रवाशांना बसची वाट पाहात उभे रहावे लागते.

ऑगस्ट २०१५ मध्ये सुरू झाली होती रेल कार सेवा...
९ ऑगस्ट २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्कालीन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत  पार्सेकर याच्या उपस्थितीत पेडणे रेल्वेस्थानकावर या रेल्वेला हिरवा बावटा दाखवून उद्‍घाटन केले होते. तेव्हापासून ही रेलकार चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली होती. दिवसातून या रेलकारच्या दोन फेऱ्या होत होत्या. 

सकाळी ६ वाजता कारवार रेल्वे स्थानकावरून सुटलेली ही रेलकार सुमारे ९ वाजता पेडणे रेल्वे स्थानकावर पोचत होती. पुन्हा सकाळी ९.३० वाजता पेडणे स्थानकावरून ती परतीच्या प्रवासाला रवाना होऊन साडेबारा वाजता कारवार स्टेशन गाठायची. पुन्हा  दुपारी २.२० वाजता कारवार -  पेडण्याकडे रवाना होत होती. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता पेडण्याहून सुटून ती कारवारला जात असे. 

या प्रवासात कारवार ते पेडण्यापर्यंत कारवार व पेडणे सोडून अस्नोटी, लोलये, काणकोण, बाळ्ळी, मडगाव, सुरावली, म्हाजोर्डा, वेर्णा, करमळी, थिवी असे दहा थांबे या रेलकारला होते. त्यामुळे येथील प्रवाशांची सोय होत होती. या रेलकारला चार कोचीस आहेत. पेडणे ते कारवार हे ११७ किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी २ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागत होता. तिची सरासरी गती प्रति तास ४० किलोमीटर आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या