‘होम आयसोलेटेड’ व्यक्तीपर्यंत पोहचणार आरोग्य खाते

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

राज्यात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

पणजी: कोविडची लागण झालेले जे ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत, त्यांच्या आरोग्याचे अपडेट घेण्याहेतू आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याच्या दृष्टीने आता आरोग्य खाते मार्गदर्शनाच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे. 

राज्यात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

आरोग्य खाते यासाठी एक मजबूत यंत्रणा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि प्रत्येक आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारीही आता या उपक्रमात आपला सहभाग नोंदविणार आहेत.

डिजिटल थर्मामीटर, ऑक्सीमीटर, स्पायरोमीटर, हँड सॅनिटायझर, एन ९५ मास्क, ग्लोव्हज, व्हिटॅमिन सी आणि डी टॅबलेट आणि एचसीक्यू टॅबलेटचा मोफत होम आयसोलेशन किट हे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना देण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

खासगी इस्पितळात उपचाराचा दर दिवसाला १२ हजार रुपये!
गोवा सरकारने आता खासगी इस्पितळात देण्यात येणाऱ्या उपचारांचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार जनरल वॉर्डमधील कोविड उपचार दर हा दिवसाला १२ हजार रुपये, एका खोलीत दोघेजण असतील, तर दिवसाला १५ हजार रुपये आणि एका व्यक्तीसाठी स्वतंत्र खोली दर दिवसाला १८ हजार रुपये, व्हेंटिलेटर असलेला अतिदक्षता विभाग दिवसाला २५ हजार रुपये असेल. या पॅकेजेसमध्ये इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागणारे खाटाचे भाडे, नर्सिंग, पीपीइ किट यासारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या