कोकण रेल्‍वेकडून मालपे बोगद्यातून वाहतुकीला ग्रीन सिग्‍नल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

आजपासून मालपे येथील बोगद्यातून रेल्वेवाहतूक सुरू झाली आणि मुंबईकडे जाण्यासाठी सुरक्षित व स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

पेडणे: मुंबईला जाण्यासाठी गेले सव्वा महिना रेल्वेचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन १२-१४ तासांचा कंटाळवाणा बसप्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. या दिवसात दोन ते तीन हजार रुपयांचे बसभाडे आकारले जात होते. २२ प्रवासी घेऊनच बस नेण्याचे बंधन असल्याने बस व्यावसायिकांपुढे प्रवास भाडे वाढवण्याशिवाय पर्यायही नव्हता. आजपासून मालपे येथील बोगद्यातून रेल्वेवाहतूक सुरू झाली आणि मुंबईकडे जाण्यासाठी सुरक्षित व स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

मडगाव- दिवा पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस या लोकप्रिय रेल्वेगाड्या अद्याप सुरू झाल्या नसल्या, तरी येत्या काही दिवसांत त्याही सुरू होतील अशी अनेकांना अपेक्षा आहे. सध्या लांब पल्ल्यांच्या मोजक्याच गाड्या धावत असल्या तरी बससेवेला पर्याय मिळाल्याने रेल्वे धावू लागल्याची माहिती अनेकांनी स्वतःहून इतरांना आनंदाने आज दिली.

मंगळवारी रात्री १० वा. चाचणी
मालपे येथील रेल्वेच्या बोगद्याच्या भिंतीच्या दुरुस्तीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १५ रोजी रात्री १० वा. दुरुस्तीकाम पूर्ण केलेल्‍या बोगद्यातून रेल्वेचे इंजिन चाचणीसाठी धावले. ‘फिटनेस’ प्रमाणपत्र मिळाल्‍यावर आज पहाटे ३ वाजता एर्नाकुलम ते दिल्ली मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस ही पहिली रेल्वे बोगद्यातून दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर मालवाहू रेल्वे दोन्ही बाजूनी धावल्या. आज रात्री ८.३० वा. दिल्ली ते एर्नाकुलम ही मंगला एक्सप्रेस बोगद्यातून केरळला निघाली, तर लोकमान्य टर्मिनस मुंबईहून निघालेली नेत्रावती गाडी ९ वाजता बोगद्यातून केरळला निघाली. बोगद्याची भिंत कोसळल्यामुळे ६ ऑगस्टपासून बंद झालेल्या गाड्या पुन्हा धावणार  आहेत.

कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या रेल्वेगाड्या
रेल्वे क्रमांक ०२६१७ एर्नाकुलम निजामुद्दीन स्पेशल एक्सप्रेस मडगाव ते कल्याण १५ सप्टेंबर २०२० रोजी सुटली. रेल्वे क्रमांक ०२६१८ एर्नाकुलम स्पेशल एक्सप्रेस कल्याण-मडगाव -मंगळूर १५ सप्टेंबर २०२० रोजी सुटली. रेल्वे क्रमांक ०२२८४ निजामुद्दीन एर्नाकुलम दुरांतो स्पेशल एक्सप्रेस पनवेल -मंगळूर १९ सप्टेंबर २०२०. रेल्वे क्रमांक ०२४३२/०२४३१ नवीदिल्ली तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस १६ सप्टेंबर २०२० रोजी सुटली. रेल्वे क्रमांक ०६३४५/०६३४६ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम स्पेशल एक्सप्रेस १६ सप्टेंबर २०२० रोजी सुटली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या