एक ‘प्‍लाझ्‍मा’ दाता वाचवतो दोघांचे जीव

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

डॉ. उदय काकोडकर : कोरोनामुक्त झालेल्यांनी ‘प्लाझ्मा’ दानासाठी पुढे यावे

पणजी: कोरोनातून मुक्त झालेला रुग्ण आपल्या प्लाझ्माद्वारे दोन जीव वाचवू शकतो. रक्तातून प्लाझ्मा काढल्यानंतर त्या रक्ताची शरीरात होणाऱ्या पुनर्भरणाविषयी गैरसमज बाळगू नयेत आणि लोकांनी अधिकाधिक पुढे येऊन प्लाझ्मादान करावा, असे आवाहन कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. उदय काकोडकर यांनी ‘गोमन्तक’कडे बोलताना केले.

राज्य आरोग्य संचालनालयाने राज्यभर आता प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्यासाठी मोहीम राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना झालेल्या रुग्णालयाच्या शरीरात प्रतिकारकशक्ती निर्माण करणाऱ्या पेशी तयार करण्याचे काम प्लाझ्मा करीत असतो. त्यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. याबाबत डॉ. काकोडकर म्हणाले की, रुग्णांची संख्या पाहता दिवसाला सहा- सात लोक प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत. ही संख्या खरीतर वाढली पाहिजे. जेवढे लोक दिवसाला बरे होऊन घरी परतात त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे प्लाझ्मा देण्यासाठी यायला हवे पण ते येत नाहीत. 

डॉ. काकोडकर म्हणाले की, एका व्यक्तीच्या शरीरात पाच लीटर रक्त असते. त्यातील द्रव रुपात असणारा २०० मि.ली. प्लाझ्मा काढला जातो. २०० मि.ली. प्लाझ्मा  हा दोन व्यक्तींचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी याचा विचार करायला हवा. राज्य सरकारने प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाची वर्षभर आरोग्य तपासणी मोफत करण्याची घोषणा केली आहे. तरी लोक अजूनही प्लाझ्मा देण्यासाठी हिरहिरीने पुढे येत नसल्याचे चित्र आहे. 

मनातून न्यूनगंड दूर करा
लोकांमध्ये प्लाझ्मा देण्याविषयी गैरसमज पसरला गेला आहे. रक्तातून प्लाझ्मा काढल्यानंतर रक्त पुन्हा शरीरात चढविले जाते. त्यावेळी फार वेदना होतात, असे सांगितले जाते याबाबत डॉ. काकोडकर म्हणाले की, ज्यांना रक्त नको आहे त्यांनी पुन्हा पुनर्भरण करू नये. पण रक्तदान तरी करण्यास काय हरकत आहे.

रक्तदात्यांनीही पुढे यावे!
जे प्लाझ्मा दान करू इच्छितात त्या व्यक्तींनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे. कोरोना न झालेल्या व्यक्तीच्या प्लाझ्माचा इतर रुग्णांच्या आजारावर उपचारासाठी उपयोग होत आहे. राज्यात प्लाझ्मा काढण्यासाठी अद्ययावत यंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे लोकांनी गैरसमज न बाळगता सर्वात श्रेष्ठ दान समजणारे रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन असल्याचे डॉ. काकोडकर यांनी केले.

संबंधित बातम्या