भारत महासत्ता बनविण्याचे पंतप्रधानांचे ध्येय: उद्योजक श्रीनिवास धेंपो

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

उद्योजक श्रीनिवास धेंपो म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे कार्य मी अनेक वर्षापासून जवळून पाहिले आहे. त्यानी सुरू केलेले स्वच्छता अभियान याचे महत्त्व आता देशातील लोकांना कळले आहे. सामान्यातील सामान्यापर्यंत सरकारच्या योजना पोहचाव्या यासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत.

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक धोरणे व योजना गोरगरीब, दुर्बल व सामान्य लोकांसाठी राबवून तसेच देशाला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले आहे. या योजनांमधून लोकांना सशक्तीकरण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. सर्वसामान्यांना डिजीटल सशक्तीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारत देश महासत्ता तसेच सर्व क्षेत्रात निपुण व सक्षम करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे त्यात ते यशस्वी ठरत असल्याचे मत प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास ऊर्फ बाबा धेंपो यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात गेला आठवडाभर प्रदेश भाजपतर्फे गोव्यात सेवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज या सांगता कार्यक्रमाच्या आभासी सभेत मुख्य वक्ते या नात्याने श्रीनिवास धेंपो उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच सिद्धार्थ कुंकळ्येकर यासह अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित  होते. 

पुढे बोलताना धेंपो म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे कार्य मी अनेक वर्षापासून जवळून पाहिले आहे. त्यानी सुरू केलेले स्वच्छता अभियान याचे महत्त्व आता देशातील लोकांना कळले आहे. सामान्यातील सामान्यापर्यंत सरकारच्या योजना पोहचाव्या यासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत. भारताला महासत्ता करण्यासाठी त्यांनी इतर राष्ट्रांबरोबर मैत्री करण्याचे सत्र सुरू करून यशस्वी ठरले आहेत. मोठमोठ्या कंपन्यांच्या मदतीने त्यानी देशात सुमारे ९ कोटी शौचालये उभारून देश हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या विविध योजनांमध्ये अनेक राज्यात बदल होऊ लागले आहेत. 

केंद्र सरकारने डिजीटल इंडिया सुरू करून लोकांना घरबसल्या सर्व योजनांची माहिती देण्याबरोबरच त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. भारत आयुषमान योजना, महिला सशक्तीकरण अशा अनेक योजनांद्वारे मोदी यांनी लोकांना सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. ‘जीएसटी’बाबत त्यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेऊन भारतातील उद्योजकांना दिलासा दिला. कोविड - १९ च्या काळात टाळेबंदीचा निर्णय घेतला नसता तर देशात तीन पटीने हानी झाली असती. त्यांनी लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी हे निर्णय घेतले. ‘आत्मनिर्भर भारत’बाबतची त्यांची हाक गोव्यालाही फायदेशीर ठरणार आहे. त्यांनी देशात चांगले तंत्रज्ञान आणून ‘मेक इन इंडिया’द्वारे लोकांना आत्मनिर्भर केले आहे असे धेंपो सांगून पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी उद्योजक म्हणून झालेला संपर्क व त्यांची विचारधारा याबाबत धेंपो यांनी आठवणी सांगितल्या. 

यावेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लहानपणापासूनचा खडतर प्रवास याची माहिती करून देत ते म्हणाले की, केंद्रात भाजप सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली असल्यापासून देशाची मोठी प्रगती झाली आहे. भारत महासत्ता करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. कोविड महामारीच्या काळात त्यांनी देशात कमी वेळात साधनसुविधा उभारून हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले आहे. अनेक राष्ट्रे त्यांच्यावर विश्‍वास ठेवून गुतंवणूक करण्यास तयार झाली आहेत. राज्यात ‘स्वयंपूर्ण गोवा’ उद्‍घाटन येत्या २ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. 

२५ सप्टेंबरला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सर्व कार्यक्रम मार्गदर्शक सूचनांचे पालन करून केल्‍याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या