स्वप्निल वाळके खून प्रकरण: खून करून जबरी चोरीचाच कट; पोलिसांचा निष्कर्ष

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

या खून प्रकरणाच्या तपासकामासाठी क्राईम ब्रँचने तीन वेगवेगळी पथके तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी नियुक्त केली आहे व त्यांनी अनेक पुरावे जमा करून दिले आहेत.

पणजी: मडगाव येथील कृष्‍णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा खून करून जबरी चोरी करण्याचा कट संशयितांचा होता या निष्कर्षाप्रत पोलिस तपास पोहोचला आहे. दुकानाबाहेर वाळके यांच्याशी मुस्तफा व एव्हेंडर हे झटापट करताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वाळके यांच्या कुटुंबियांमधील काही सदस्यांचे मिळून सुमारे २० जणांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. 

या खून प्रकरणाच्या तपासकामासाठी क्राईम ब्रँचने तीन वेगवेगळी पथके तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी नियुक्त केली आहे व त्यांनी अनेक पुरावे जमा करून दिले आहेत. संशयितांनी २ सप्टेंबरला कृष्‍णी ज्वेलर्स यांच्या दुकानासमोर गाडी उभी केल्यानंतर ते गुन्हा करीपर्यंत कोणकोणत्या ठिकाणी गेले, तेथील पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे आज घेण्यात आले आहे. 

ओमकार व एव्हेंडर या दोघांनी पणजीतील ज्या पेट्रोल पंपवर दुचाकीमध्ये पेट्रोल भरले होते तेथील सीसीटीव्ही कॅमेरामधील व्हिडिओ घेण्यात आला आहे. या तपासाची साखळी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संशयित एव्हेंडर हा अट्टल चोर असून त्याने अनेकांकडून लाखो रुपये व्याजाने घेतले होते. ते परत करण्यासाठी त्याला मोठी चोरी करण्यावाचून पर्याय नव्हता. 

संशयित मुस्तफा हा निर्ढावलेला गुन्हेगार असल्याने त्याने या कामासाठी त्याची मदत घेतली. मुस्तफाने चोरी केल्यानंतर चोरीचा माल घेऊन पसार होण्याचा त्याचा कट होता मात्र त्यामध्ये सफल झाला नाही, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या