अफगाणी नागरिकाचे अपहरण करून त्याला पर्वरीत डांबले ;पोलिसांची 48 तासांत कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

दिल्लीतील शापूर झरीफी या अफगाणी नागरिकाचे अपहरण करून त्याला पर्वरीत डांबून ठेवून खंडणी मागितल्या प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पणजी : दिल्लीतील शापूर झरीफी या अफगाणी नागरिकाचे अपहरण करून त्याला पर्वरीत डांबून ठेवून खंडणी मागितल्या प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांत आलेक्स डिसोझा (वय 29 रा. पेडणे) व रॉबिन्सन डिसोझा (वय 23, रा. पेडणे) या दोन गोमंतकीयांचा समावेश आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यापासून दोन दिवसाच्या आत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अफगाणी नागरिकाची सुटका करताना पंजाबातून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या अन्य एका व्यक्तीचीही पोलिसांनी सुटका केली आहे.अमली पदार्थ विरोधी कारवाया करून पोलिसांनी त्या व्यवसायाचा कणा मोडण्याचा प्रयत्न चालवला असला तरी मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे गोव्यात नेमका कोण येतो याची माहिती ठेवणे कठीण जात असल्याने गुन्हेगारांनी गोव्यात आश्रय घेणे सुरू केले आहे असे दिसून येते.

पर्वरी येथील बंगला पर्यटक आहोत असे भासवून भाडेपट्टीवर घेतला होता का, बंगल्याच्या मालकाने भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला दिली होती का याची माहिती आता पोलिस घेत आहेत. पेडणे पोलिस, वास्को पोलिस, पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील गुन्हे शाखा यांनी ही एकत्रितरीत्या कारवाई करून 12 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये रोजगारासाठी पाठवतो म्हणून दिल्लीत हे संशयित सावज हेरायचे त्यांना बोलून घ्यायचे आणि डांबून ठेवून त्यांना मित्रांना दूरध्वनी करून प्रवासासाठी रक्कम मागण्यास भाग पडायचे ती रक्कम खंडणी स्वरूपात ते उकळायचे अशी या संशयितांची कार्यपद्धती होती. या प्रकरणी 11 फेब्रुवारीला एका महिलेने वास्को पोलिसात तक्रार दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या प्रियकराचे गोव्यात सात फेब्रुवारीला आगमन झाल्यानंतर अपहरण झाले आहे. तिला नंतर व्हॉट्सऍप वर आवाजी संदेश पाठवून तिचा प्रियकर टोरंटो कॅनडाला गेल्याचे सांगण्यात आले होते मात्र त्याने आपल्याला गोव्यातच कुठेतरी बंदिवान बनवून ठेवले आहे असे संकेत व्हाट्सअप संदेशातून दिले होते. त्यामुळे तिने वास्को पोलिसात तक्रार नोंदवली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला यात वास्को पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागातील गुन्हे शाखा, पेडणे पोलिस आणि दहशतवाद विरोधी पोलिस पथक यांनी भाग घेतला पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना आणि पंकज कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू होता. तांत्रिक माहितीची पडताळणी केल्यानंतर संशयिताला पर्वरी परिसरात डांबून ठेवले असावे अशा निर्णय निष्कर्षाप्रत पोलिस पथके आले आणि त्यांनी पर्वरीतील एका बंगल्यातून संशयिताची सुटका करताना बारा जणांना पकडले. या कारवाईवेळी एका संशयिताचे एक 13 वर्षीय मुलगाही सापडला, त्याला अपना घरात पाठवण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान पंजाबातून अपहरण केलेल्या अन्य एका व्यक्तीची ही सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे मात्र त्या विषयीचा अधिक तपशील आता उपलब्ध होऊ शकलेला नाही.

व्हर्च्युअल पर्सनल नेटवर्क

व्हॉट्सअप वरून आवाजी संदेश पाठवताना व्हर्च्युअल पर्सनल नेटवर्क म्हणजे व्हीपीएन या संगणक प्रणालीचा ते वापर करत असत त्यामुळे नेमका संदेश कुठून पाठवला याची माहिती कळत नसे, मात्र पोलिसांनी अन्य पद्धती वापरून या संशयितांचे नेमके स्थान शोधून काढले आणि त्यांना पकडले.याविषयी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत असे आढळून आले की सुशील सिंग उर्फ ऋषभ याने ही खंडणी उकळणारी टोळी तयार केली आहे. त्याने पर्वरी मध्ये एक बंगला भाड्याने घेतला होता. त्याच्या टोळीतील काही माणसे ही दिल्लीमध्ये विदेशात रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना हेरत व त्यांच्याशी ते संवाद साधत. या अफगाणी नागरिकांशी याच पद्धतीने त्यांनी ओळख काढली व त्याला नोकरीसाठी कॅनडाला  पाठवण्याची तयारी दाखवली. तिकिटे व्हिसासाठी त्याच्याकडून दोन लाख रुपये आगावू घेतले. ते मिळाल्यावर प्रवासाची कागदपत्रे तयार आहेत असे सांगून त्याला कॅनडाला जाण्यासाठी त्यांनी गोव्याला बोलावून घेतले.

7 फेब्रुवारीला तो गोव्यात पोचल्यावर त्याला पर्वरी येथील बंगल्यात डांबून ठेवण्यात आले. त्याला त्याच्या मित्रांशी अफगाणी भाषेत संवाद साधून कॅनडा प्रवासासाठी 20 हजार अमेरिकी डॉलर मागण्यास सांगण्यात येत होते. तसे न केल्यास  तुझ्या जिवाला धोका आहे अशी भीती त्याला घालत असत. या दरम्यान त्या अफगाणी नागरीकाने आपल्या प्रेयसीला आपल्याला गोव्यातच कुठेतरी डांबून ठेवले आहे आपण कॅनडाला गेलो नसल्याचे अफगाणी भाषेत कळवण्यात यश मिळवले. त्यानंतर ती गोव्यात आली आणि तिने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली.या तपासादरम्यान त्याला या टोळीने दिलेले दिल्ली ते टोरंटो एअर  इंडिया विमान तिकीट व बोर्डिंग पास हे बनावट असल्याचे आढळले आहे. संशयिताच्या कुटुंबीयांना बनावट बोर्डिंग पास आणि पासपोर्ट च्या प्रती पाठवून ते विश्वास संपादन करत अशी माहिती पोलिस तपासात मिळाली आहे.

संबंधित बातम्या