Goa: बाळ पळवण्यामागे काय 'हेतु' होता? अपहरणकर्त्या महिलेने दिले उत्तर
crime news

Goa: बाळ पळवण्यामागे काय 'हेतु' होता? अपहरणकर्त्या महिलेने दिले उत्तर

पणजी: लागोपाठ चार मुली झाल्यामुळे वंशाला दिवा हवा, असा कुटुंबियांचा आग्रह होता. त्यामुळे त्या महिलेने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या (Goa Medical College) आवारातून एक महिन्याचे बाळ (Baby) पळवल्याची (Kidnap) धक्कादायक माहिती पोलिस तपासातून (Police Investigation) पुढे आली आहे. हे मूल कोणाचे हे ठरवण्यासाठी मुलावर दावा करणाऱ्या दोन्ही महिलांची वैद्यकीय चाचणी करण्याचे पोलिसांनी ठरवले असले तरी समांतर पद्धतीने केलेल्या तपासात वारस म्हणून मुलगाच हवा या बुरसटलेल्या मानसिकतेचा बुरखा फाडला गेला. (Goa Police have arrested a woman who abducted a baby from Goa Medical College)

बांबोळी येथून शुक्रवारी पळवण्यात आलेले बाळ शनिवारी सायंकाळी उशिरा सालेली सत्तरी येथे सापडले. त्या घरात बारसा सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सालेली येथील विश्रांती गावस या महिलेला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. तक्रारदार ललिता नाईक ही आगशी येथे वास्तव्यास असून ती मूळची ओडिशातील आहे. 

समाजमाध्यमावर फिरू लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील स्कूटरचा क्रमांक टिपण्यात पोलिसांना यश आले. वाहतूक खात्यातून त्या स्कूटरच्या मालकाचा पत्ता मिळवून पोलिस तिथे धडकले. म्हापसा ते वाडो डिचोली परिसरापर्यंत ती महिला त्या स्कूटरवर बसून आली होती. स्कूटरचालक असलेली व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे. महिला अर्भकाला घेऊन प्रवास करत असल्याने तिला डिचोलीपर्यंत आणल्याचे त्याने सांगितले. एका बस प्रवाशाने पोलिसांना डिचोली ते सालेलीपर्यंत एका महिलेने अर्भकासह काल बसप्रवास केल्याची माहिती दिली. त्यामुळे साध्या वेशातील पोलिस सालेलीत पोचले. तेथे चौकशी केल्यावर एका घरात बारशाचा कार्यक्रम सुरू असल्याचे समजले. पोलिस तेथे पोचले असता तेथे थोडी गर्दी होती. पोलिसांनी मुलाविषयी तपास आरंभल्यावर संबंधित कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. त्यामुळे संशय बळावला आणि त्या दांपत्याला मुलासह घेऊन डिचोली पोलिस ठाण्यावर आले.

बाळावर दोघींचा दावा
संशयित महिलेच्या पतीने  महिनाभराने आपण आजच बाळाचा चेहरा पाहिल्याचे नमूद केले. या दोन्ही महिला एकाच मुलावर दावा करू लागल्याने  पोलिसांनाही धक्का बसला. ही घटना बांबोळी येथे घडल्याने त्या सर्वांना आगशी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. अद्यापही ती महिला खरोखरच गर्भवती होती का, ती प्रसूत झाली तर तिचे बाळ कुठे आहे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

पायलट, लिफ्ट देणाऱ्याची मदत
बाळाला पळविणाऱ्या महिलेला बांबोळी ते पणजी बसस्थानक असे आणणारा पायलट, स्कूटरवर लिफ्ट देणारा या सगळ्याना पोलिसांनी बोलाविले. त्यांच्याकडे चौकशी केली असता महिलेलाही ओळखले तर तक्रारदार महिलेने आपल्या बाळाची ओळख पटवून सांगितली. शोध मोहिमेत पायलटांची महत्त्वाची भूमिका ठरली. 

विश्रांती गावसने असे का केले ?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विश्रांती मोहन गावस हिने  वयाच्या तिशीत चार मुलींना जन्म दिला होता. वंशाला दिवा हवा म्हणून तिने आपण गर्भवती असल्याचे कुटुंबियांना सांगितले होते. कोविडमुळे गरोदरपणा व प्रसूतीदरम्यान आपण माहेरीच राहू असेही तिने पटवून दिले. प्रसूत झाल्यानंतर आपल्याला कोविडची लागण झाल्याने आपण गृह अलगीकरणात राहते असे घरातल्याना सांगितले होते. तिने कपड्यात गुंडाळलेले अर्भकसदृश बाळ आपल्यासोबतच ठेवले होते आणि त्या खोलीत कोणासही येण्यास ती मज्जाव करत होती.तिच्यासोबत खरोखरचे बाळ नसल्याने काही दिवसांनी तरी घरातल्यांना बाळ दाखवावे लागेल यासाठी गोमेकॉ परिसरातून बाळ पळवण्याचा निर्णय तिने घेतला आणि तिने ती संधी घेतली ज्यावेळी तक्रारदार महिलेचा पती पोलिओ लसीकरणासाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी गोमेकॉ इमारतीच्या आत गेला होता.

बाळ मातेकडे सुपूर्द
पोलिसांनी रात्री उशिरा तक्रारदार महिलेकडे बाळ सुपूर्द केले. यामुळे गेले 24 तास रंगलेल्या नाट्यावर पडदा पडला. दुसरीकडे, बाळ आपल्याकडे परत आल्यामुळे मातेला आपला आनंद आवरता आला नाही. तिने पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले. 

गोवा पोलिसांचे 24 तासांत एक महिन्याच्या बाळाचा शोध लावल्याबद्दल अभिनंदन करतो. राज्यातील सर्वात मोठी ही शोधमोहीम असावी. सरकार जनतेच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेला  प्राधान्य देते असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com