राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्यानिमित्त पोलिसांनी घेतली सुरक्षा व्यवस्थेची बैठक

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

षष्ठ्यब्दी गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षितेसंदर्भातची बैठक आज पोलिस मुख्यालयात झाली.

पणजी: षष्ठ्यब्दी गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या सुरक्षितेसंदर्भातची बैठक आज पोलिस मुख्यालयात झाली. राजधानी पणजीत यावेळी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमांच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेचा तसेच वाहतूक मार्गबदल आराखडा तयार करण्यावर चर्चा झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे १९ व २० डिसेंबरला गोव्यात असतील. त्यांच्या गोव्यातील वास्तव्याचा कार्यक्रम अजूनही निश्‍चित झालेला नसला, तरी पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेबाबतची पूर्वतयारी सुरू केली आहे. कांपाल येथील मैदानावर गोवा मुक्तिदिन षष्ठ्यब्दी कार्यक्रम आयोजित केला असून त्याला ते प्रमुख पाहुणे असतील.

त्यामुळे या कार्यक्रमावेळी पणजीतील वाहतूक मार्गामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवेळी दयानंद बांदोडकर मार्ग हा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावरील स्मारकाला ते भेट देणार असल्याने या मैदानाच्या सभोवतीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. तेथील स्मारकाचीही डागडुजी सुरू आहे. दयानंद बांदोडकर रस्त्याच्या बाजूने पदपथावर असलेल्या दिव्यांचीही दुरुस्ती सध्या सुरू आहे. 

राज्यात शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या काळात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मिरामार समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत असल्याने ही वर्दळ कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबत आराखडे तयार करत आहेत.

संबंधित बातम्या