मुक्तिदिन सोहळ्यास जाणाऱ्या जीवरक्षकांना पोलिसांनी रोखले

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

हुतात्मा चौकात म्हापसा पालिकेने आयोजित केलेल्या गोवा मुक्तिदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे दीडशे जीवरक्षकांना म्हापसा पोलिसांनी दूरवरच अडविले.

म्हापसा: येथील हुतात्मा चौकात म्हापसा पालिकेने आयोजित केलेल्या गोवा मुक्तिदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे दीडशे जीवरक्षकांना म्हापसा पोलिसांनी दूरवरच अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर कार्यक्रमापासून थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूने पदपथावर उभे राहू देण्यात आले.

जीवरक्षकांपैकी सुमारे सत्तर जण गांधी चौकात गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आळीपाळीने उपोषणास बसणाऱ्या अन्य सुमारे दीडशे जीवरक्षक स्वत:च्या गणवेशासह आज सकाळी शांततापूर्ण मार्गाने शिस्तबद्धपणे कार्यक्रमस्थळी येत होते. तेवढ्यात म्हापसा पोलिस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक रूपाली गोवेकर व सहकारी पोलिस लाठ्या घेऊन धावत जाऊन त्यांना वाटेतच अडवले. तुम्ही कशासाठी इथे आला आहात, अशी विचारणा पोलिस अधिकारी जीवरक्षकांना करू लागले. तेव्हा, आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहायला आलो आहोत, असे जीवरक्षकांनी सांगितल्यानंतर, तुम्हाला पुढे जाता येणार नाही असे पोलिसांनी त्यांना बजावले.

त्या वेळी जीवरक्षकांची बाजू मांडताना स्वाती केरकर व संजय बर्डे यांनी मुक्तिदिन सोहळ्यात शांततापूर्ण मार्गाने सहभागी होऊन राष्ट्रध्‍वजाला वंदन करणे हा गुन्हा आहे का, असा प्रतिसवाल पोलिसांना केला. तेव्हा अखेरीस त्या जीवरक्षकांना थोडेसे पुढे जाऊ देण्यात आले. परंतु, त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणामासून सुमारे तीस मीटर दूरवर फूटपाथवर राहू देण्यात आले.

व्यासपीठीय कार्यक्रम जीवरक्षक उभे राहिलेल्या ठिकाणापासून सुमारे चाळीस मीटर अंतरावर होता. तिथे जाण्याची मुभा जीवरक्षकांना पोलिसांनी दिलीच नाही. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अन्य सर्व मान्यवरांना व इतर लोकांनाही सहभागी होऊ देण्यात आले. केवळ जीवरक्षकांनाच मज्जाव करण्यात आला. जीवरक्षकांनी अखेर कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी वगैरे न करता शांततापूर्णतेने ध्वजवंदन केले.

जीवरक्षकांच्या मागण्यांसाठी अशा अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध करणे आम्हाला आवश्यक वाटले व त्यामुळेच सर्व जीवरक्षक गणवेश परिधान करून त्या ठिकाणी आले होते, अशी माहिती जीवरक्षकांच्या या अभिनव स्वरूपाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा हे कार्यक्रमाला उपस्थित होते व एवढ्या मोठ्या संख्येने म्हापशात आलेल्या या जीवरक्षकांची त्यांनी निदान साधी विचारपूस तरी करणे आवश्यक होते. तथापि, त्यांनी ते प्रकर्षाने टाळले हे मोठे दुर्दैव आहे, असेही श्री. बर्डे या वेळी म्हणाले. हे सर्व जीवरक्षक गोमंतकीय असून त्यांना मुक्तिदिन सोहळ्यापासून परावृत्त करणे सर्वार्थाने चुकीचे आहे, असे या वेळी स्वाती केरकर म्हणाल्या. या कार्यक्रमाला पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी उपस्थित राहिले होते.

आणखी वाचा:

बाबू आजगावकर यांची लोकविरोधी कृत्ये आता मी वेशीवर टांगणार आहे -

संबंधित बातम्या