केपेत खळबळ: युवतीचा मृतदेह ओहोळात सापडला, युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

एकाच दिवशी दोघांचा मृत्यू होणे यात संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनिशा वेळीप हिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्‍यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

कुडचडे, सासष्‍टी: खेडेबारसे येथील अनिशा वेळीप (१८ वर्षे) या युवतीचा संशयास्‍पदरीत्या ओहोळात मृतदेह आढळल्याने गावात तणाव निर्माण झाला. सकाळी कपडे धुण्यासाठी ओहोळावर गेलेली मुलगी परतली नाही म्हणून घरची मंडळी शोधण्यासाठी गेली असता तिचा मृतदेह अोहोळात आढळून आला. पाणी कमी असतानाही मृत्यू होणे संशयास्‍पद असल्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्‍यात आला. शवचिकित्सेनंतर मृत्‍यूचे नेमके कारण स्‍पष्‍ट होईल. ही घटना केपे मतदारसंघात घडली. दरम्‍यान, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी घटनास्‍थळी भेट देऊन वस्‍तुस्‍थिती जाणून घेतली.

दुसऱ्या घटनेत सांगे मतदारसंघातील भटकावरे येथील सर्वेश गावकर (२२ वर्षे) या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. सर्वेश याला खेडेबारसे गावात सकाळी पाहिल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले. एकाच दिवशी दोघांचा मृत्यू होणे यात संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनिशा वेळीप हिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्‍यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तर सर्वेश गावकर खेडेबारसे गावात जाऊन आल्यानंतर आत्महत्या का केली? याचे कारण उद्या स्पष्ट होणार आहे. त्‍या दोघांचा परिचय होता, अशीही चर्चा स्‍थानिकांत दबक्‍या स्‍वरात सुरू होती. तर काहीजणांच्‍या मते त्‍या दोघांची मैत्री होती, अशीही चर्चा आहे. सर्वेश गावकर हा खेडेबारसे गावात आल्यानंतर थोड्याशा पाण्यात अनिशा वेळीप हिचा मृत्यू होणे, यात नक्कीच काही तरी संबंध असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कुंकळ्ळी पोलिस उपनिरीक्षक अरुण एंड्रू व केपे पोलिस उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई या दोन्ही प्रकरणी तपास करीत आहेत.

मनाला चटका लावणाऱ्या घटना : प्रसाद गावकर
केपे मतदारसंघात दोघांचे मृत्‍यू झाल्‍यामुळे सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी त्‍वरित घटनास्‍थळी भेट दिली. दुपारी तीन वाजता भटकावरेत आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचल्‍यावर खेडेबारसे येथे घटना घडल्याची माहिती मिळाल्‍यावर तेथेही जाऊन पाहणी केली. दोन्ही घटना मनाला चटका लावणाऱ्या होत्या. टोकाच्या भूमिका न घेता बसून तोडगा काढला जाऊ शकतो. समजूतपणा दाखवा, असे आवाहन त्‍यांनी तरुण पिढीला केले आहे. 

उत्तरीय तपासणीनंतर व पोलिस तपास केल्‍यानंतर सत्यस्‍थिती उघड होईल, असे आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले. या दोन्‍ही घटनांमुळे केपे तालुक्‍यात खळबळ उडाली.

मृत्‍यूचे कारण आज समजणार?
अनिशा ही केपे कॉलजची विद्यार्थिनी असून ती प्रथम वर्षाला शिकत होती. रविवारी सकाळी ती आपल्या घरासमोरील ओहोळावर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्‍यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. त्‍यानंतर तिला इस्‍पितळात नेण्‍यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृतदेहावर कोणतीही जखम आढळून आली नाही. मात्र, कपडे धुण्यासाठी गेलेली मुलगी बराच वेळ झाली, तरी परतली नाही म्हणून चौकशीसाठी गेलेल्यांना सर्वेश गावकर हा घटनास्‍थळाकडून पळत असताना दिसून आला होता. मात्र, अनिशाचा मृत्यू कशा पद्धतीने झाला, हे कळून आले नाही. ओहोळातील पाण्याच्या खळखळाटामुळे कोणताही आवाज कुटुंबियांना आला नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या