श्रीमंत मित्रांची भलावण करण्याचे केंद्राचे धोरण: गिरीश चोडणकर

Goa: policy of BJP are against the people's interest says Girish Chodankar
Goa: policy of BJP are against the people's interest says Girish Chodankar

पणजी: केंद्रातील भाजप सरकारचे पंतप्रधानांच्या श्रीमंत मित्रांची भलावण करण्याचे एकमेव धोरण आहे. मागील सहा वर्षात केवळ आपल्या स्वार्थासाठी भाजपने कष्टकरी सामान्य माणसाला देशोधडीस लावून दिवाळखोरी केली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, सरचिटणीस सचिन परब, डिचोली गट अध्यक्ष मेघश्याम राऊत, मांद्रे गट निमंत्रक नारायण रेडकर, साखळी गट अध्यक्ष मंगलदास नाईक यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले,  आज देशातील शेती उत्पादन केवळ धनदांडग्यांच्या हातात देण्याचा डाव भाजपने आखला आहे. त्यामुळेच देशातील शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. काल भाजपने लोकशाही मुल्यांची पायमल्ली करत राज्यसभेत शेती विधेयक मंजूर केले व लोकशाहीचा गळा घोटला. भाजपला गरीब जनतेचे काहीच पडलेले नाही हेच कालच्या घटनेने परत एकदा सिद्ध केले आहे.

स्थानिक भाजप सरकारने आपल्या असंवेदनशीलपणाने गोव्यात आर्थिक आणीबाणी निर्माण केल्याचा आरोप करून ते म्हणाले, भाजप सरकारला श्रीमंत लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस, जयंती यासारखे उत्सव साजरे करण्यास वेळ आहे, परंतु कष्टकरी व संकटात सापडलेले मोटारसायकल पायलट, रिक्शा, टॅक्सी, टेम्पो व बसमालक, शॅक्सचालक, खाण अवलंबित, बेकरी, चर्मोद्योग, शिंपी, खाजेकार, फुलकार, काकणकार तसेच इतरांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही. 

आपल्या मासिक पेन्शनसाठी सहा सहा महिने वाट पाहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, खलाशी तसेच इतर समाज कल्याण योजनांचे लाभार्थी, कोविड संकटात सेवा बजावणारे, परंतु सुरक्षा कवच व पीपीई कीटपासून वंचित आरोग्यसेवा कर्मचारी, महिना अखेरीस पगार न मिळणारे सरकारी कर्मचारी यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोरजी मतदारसंघातील उमेदवार बेला फर्नांडिस, मांद्रेचे उमेदवार नामदेव तुळस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस मांद्रे गट समितीचे अध्यक्ष अनिल साटेलकर आणि ५० कार्यकर्त्यांनी आज चोडणकर यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com