पुन्हा खेळी खेळण्यास सिद्ध झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशासाठी गोव्यातील दिग्गज राजकारणी तयार

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राज्यातील बदलते राजकीय वातावरण पाहता त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मागावून आयोजित केला जाणार आहे.

पणजी: राज्याच्या राजकारणात पुन्हा महत्‍त्वाची खेळी खेळण्यास सिद्ध झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशासाठी दिग्गज राजकारणी तयार आहेत. मात्र, राज्यातील बदलते राजकीय वातावरण पाहता त्यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर टाकण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मागावून आयोजित केला जाणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी या माहितीस दुजोरा दिला. ते म्हणाले, पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‍घाटन रविवारी (ता. २२) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. त्यादिवशी अनेकजण पक्ष प्रवेश करतील असे सुरवातीचे नियोजन होते. अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष प्रवेशासाठी पवार यांच्याशी संपर्क साधला होता, तर काही जणांची पटेल यांच्यासोबतही बैठक झाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार राज्यात यावे यासाठी हे नियोजन आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा कानोसा घेत हा पक्षप्रवेश थोडा लांबणीवर टाकण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी आता पक्षाध्यक्ष शरद पवार येतील असे नियोजन करण्यात येत आहे.

पक्षाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र वर्मा हे आज राज्यात दाखल झाले. पक्षाच्या राज्य कार्यकारणीसोबत त्यांची बैठक होणार आहे. रविवारी दुपारी १ वाजता पटेल यांचे राज्यात आगमन होईल, तर ते सायंकाळी साडेसहा वाजता परत जाण्यास निघणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणूक, पालिका निवडणुकीपेक्षा पक्षाने विधानसभा निवडणुकीवर अधिक लक्ष देण्याचे ठरवले आहे. विविध पक्षातील आमदार, मंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा बेत बनवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल असे दिसते. सध्या चर्चिल आलेमाव हे बाणावली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे एकमेव आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करतात. विधानसभेत त्यांची नेहमीच तटस्थ भूमिका असते.

संबंधित बातम्या