प्रियोळ मतदारसंघात राजकीय वतावरणाला 'बहुरंगी लढतीचा' तडका..!

गोविंद गावडेंचा विकासावर भर: निगळ्येंचे ‘घर घर चलो’ अभियान; दीपक ढवळीकरही सक्रिय
Goa Politics: Possibility of a triangular fight in the constituency in Priol
Goa Politics: Possibility of a triangular fight in the constituency in Priol Dainik Gomantak

फोंडा : प्रियोळ (Priol) मतदारसंघातून (constituency) यावेळी मंत्री गोविंद गावडे यांना मगोपच्या दीपक ढवळीकरांबरोबरच राजकारणात (Goa Politics) नव्याने प्रवेश केलेले व फोंड्याचे उद्योजक संदीप निगळ्ये यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढतीची संभावना निर्माण झाली आहे. गेल्यावेळी त्यांनी मगोपच्या दीपक ढवळीकर यांना 4680 मतांनी मात दिली होती.

Goa Politics: Possibility of a triangular fight in the constituency in Priol
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आज म्हापशात रंगणार जाहीर चर्चा..

सध्या प्रियोळ मतदारसंघातील राजकारण गुप्त पद्धतीने सुरू आहे. या मतदारसंघात वेलिंग- प्रियोळ- कुंकळ्ये, केरी, वेरे- वाघुर्मे, वळवई, तिवरे-वरगाव, बेतकी-खांडोळा अशा सहा पंचायती येतात. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे करीत आहेत. निगळ्ये हे सध्या आपण भाजपच्या उमदेवारीचे दावेदार असल्याचे सांगत आहेत. पण, मगोप - भाजप युती झाल्यास ही जागा मगोपकडे हे जाणार हे निश्चित. असे झाल्यास निगळ्येंची भूमिका काय? मात्र, निगळ्ये हे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत, असे कळते.

निगळ्येंकडून ‘व्होकल फॉर लोकल’ नारा

संदीप निगळ्ये यांनी या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारलेली असून सध्या ते ‘घर घर चलो अभियान’ चा उपक्रम राबविताना दिसत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजे स्थानिक उमेदवार हवा हा नारा लावत त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यातून ते गावडे यांच्‍यासमोर कितपत आव्हान उभे करू शकतात, हे बघावे लागेल. आम आदमी पक्षामध्ये नुकतेच प्रवेश केलेले नाट्यकलाकार राजदीप नाईक यांना या पक्षाशी उमेदवारी मिळू शकते. ते नाट्यकला व राजकारण यांचा समन्वय कसा साधतात ते बघावे लागेल.

Goa Politics: Possibility of a triangular fight in the constituency in Priol
युवकांच्या 'रोजगारबाबत' गोवा सरकार गंभीर..

मतविभाजनाचा लाभ कुणाला?

या मतदारसंघाची प्राथमिक चाचणी केल्यास सध्या तरी विद्यमान आमदार गोविंद गावडे यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. मगोप तर्फे दीपक ढवळीकर व भाजपतर्फे संदीप निगळ्ये यांनी निवडणूक लढविल्यास त्यांच्या मताची विभागणी होऊन याचा फायदा गोविंद गावडेंना होऊ शकतो. तसेच मगोप- भाजप युती झाल्यास व निगळ्ये यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यासही त्‍याची पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते. मात्र, युतीतर्फे दीपक ढवळीकर यांनी निवडणूक लढविल्यास व निगळ्येंनी माघार घेतल्यास गोविंद व दीपक ढवळीकर यांच्‍यामध्ये जोरदार लढत होऊ शकते.

अपक्षांची रेलचेल शक्‍य

सध्या प्रियोळात नोनू नाईक, दिग्विजय वेलिंगकर, दिनेश जल्मी, सारखे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे सूचित होत आहे. यातील बहुतेक जण हे अपक्ष म्हणून उतरतील असे दिसत आहे. गेल्या वेळेला अपक्ष गोविंद गावडे हे निवडून आल्यामुळे अपक्ष म्हणून उतरू पाहणाऱ्यांच्‍या अपेक्षा वाढल्‍या आहेत. अपक्षांच्या संभाव्य रेलचेलीमुळे मतदारसंघातील विविध समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत प्रियोळचे राजकीय भवितव्य थोडे स्पष्ट तर थोडे धूसर वाटत आहे एवढे निश्चित.

गोविंद गावडे हे मंत्री असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघातील विकासाची गती वाढविली आहे. ते अजून कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार हे निश्चित नसले सध्या तरी ते ‘एकला चलो रे’ हे धोरण अवलंबित आहेत. आपण केलेल्या विकासकामांचा दाखला ते मतदारांना देताना दिसत आहे.

Goa Politics: Possibility of a triangular fight in the constituency in Priol
सिद्धीच्या मृत्यूचे प्रकरण हाताळण्यात गोवा पोलिसांच्या 'गंभीर चुका'

गोविंद गावडेंचे ‘एकला चलो रे’

गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले असले तरी त्यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून त्यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायतीत भाजपतर्फे निवडणूक लढविलेल्या श्रमेश भोसले यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. पण, यावेळी ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार की भाजपचा हात धरून निवडणुकीला सामोरे जाणार हे अजून स्पष्ट झाले नाही. पण, गोविंद गावडे यांनी दोन्ही भूमिकांची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्‍याप्रमाणेच तेही स्वबळ वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत.

अन्‍य पक्षांचीही चाचपणी सुरू

सध्या प्रियोळात आम आदमी पक्षाचा म्हणावा तेवढा प्रभाव दिसत नाही. तृणमूल काँग्रेसने या मतदारसंघात चाचपणी सुरू केली असली तरी या पक्षातर्फे उमेदवार कोण? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण, येत्या काही दिवसांत या मतदारसंघातील एक ‘मोठा मासा’ त्यांच्या गळ्याला लागण्याची शक्यता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काँग्रेसतर्फे युवा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर हे निवडणूक लढविण्याची शक्यता दिसत आहे. मागच्या वेळी काँग्रेसच्या रामकृष्ण जल्मी यांना फक्त 429 मते प्राप्त झाली होती. आता ॲड. वरद यांना उमेदवारी दिल्यास ते कितपर्यंत बाजी मारतात हे बघावे लागेल. त्याचबरोबर नोनू नाईक, दिनेश जल्मी, दिग्विजय वेलिंगकर, हे रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे प्रियोळचे राजकीय वातावरण ढवळून निघायला लागले आहे. मात्र या मतदारसंघात ‘पर्दे के पीछे क्या है’ हे अजून ही स्पष्ट झाले नाही.

दीपक ढवळीकरांचा प्रचार सुरू

दुसऱ्या बाजूला मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी निवडणूक प्रचाराला सुरवात केली असून प्रियोळ व सावईवेरे येथे त्यांच्या बैठकाही झाल्या आहेत. पण, गेली चार वर्षे त्यांचा या मतदारसंघाशी विशेष संपर्क नसल्यामुळे तिरंगी लढत झाल्यास ढवळीकरांसमोर मोठे आव्हान उभे राहण्‍याची शक्‍यता आहे.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com