कुंकळ्ळीत प्रदूषणाबाबत आजवरची मोठी कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसहतीतील भूजल प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत असल्याच्या संशय असलेल्या नऊ कुपनलिका (बोअरवेल) गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज शोधून काढल्या.

पणजी : कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसहतीतील भूजल प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत असल्याच्या संशय असलेल्या नऊ कुपनलिका (बोअरवेल) गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज शोधून काढल्या. भूजल प्रदूषणाविषयी तक्रार आल्यानंतर मंडळाने संयुक्त मामलेदार गौरव गावकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.  कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आजवर झालेली ही मोठी कारवाई मानली जाते.

कुंकळ्ळी औद्योगिक असलेल्या फिशमील प्रकल्पांतून सांडपाणी सोडण्यासाठी कुपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्या कुपनलिकेत ते सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे भूजल प्रदूषित होते, अशी तक्रार मंडळाकडे आली होती. त्याविषयी न्यायालयीन खटलाही प्रलंबित आहे. त्याअनुषंगाने मंडळाने त्या परिसरातील भुजलाचे परीक्षण केले होते. 
प्रदूषणाचा मुद्दा पुन्‍हा चर्चेत कुंकळ्ळीवासीय या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाबाबत वारंवार तक्रार करत आहेत. कुंकळ्ळीच्या आमदारांनी वेळोवेळी विधानसभेतही याविषयी आवाज उठवला होता. बंद पडलेल्या कंपन्यांत साठवून ठेवलेल्या प्रदूषणकारी रसायनांतून प्रदूषण पसरू नये यासाठी मंडळाने याआधी कारवाई केली होती. त्यानंतर कुंकळ्ळीतील प्रदूषणाचा मुद्दा मागे पडतो की काय असे वाटत होते. मंडळाने आज केलेल्या कारवाईमुळे कुंकळ्ळीतील प्रदूषण अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.

भूजल प्रदूषणाबाबत केलेल्या पंचनाम्यावर संयुक्त मामलेदारांसोबत परीक्षणासाठी मंडळाने नेमलेले अभियंता संजय आमोणकर, संशोधक जेनिका सिक्वेरा, पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर, सहायक पर्यावरण अभियंता नंदन प्रभुदेसाई,  कनिष्ठ पर्यावरण अभियंता प्रवीण फळदेसाई,  विजय कानसेकर, वामन च्यारी,  विल्मा डिकॉस्ता, अँडरसन मास्करेन्हास, पोलिस शिपाई व कंपनीच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

तक्रारीत तथ्‍य आढळले आणि...
तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने औद्योगिक आस्थापनांची पाहणी करण्याचे ठरवले. त्यानुसार आज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आज केलेल्या पाहणीत कंपन्यांनी कुपनलिका खोदल्याचे निदर्शनास आले आहे. त्या साऱ्याचा पंचनामा करण्यात आला आहे. आजच्‍या पाहणीवेळी या कुपनलिका नजरेस पडू नये म्‍हणून त्‍यावर काँक्रिटचे झाकण आणि त्‍यावर पुन्‍हा काँक्रिट घातल्‍याचे निदर्शनास आले. सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या पथकाने काँक्रिट फोडून या कुपनलिका शोधून काढल्‍या.
 

संबंधित बातम्या