Goa Market: अखेर फोंड्यात 'निवारा शेड' उभारल्यामुळे विक्रेत्यांना दिलासा

Goa Market: मार्केट संकुलाच्या उरलेल्या कामालाही गती मिळाली आहे.
Goa Ponda Market
Goa Ponda MarketDainik Gomantak

Goa Market: फोंड्यातील बुधवारपेठ मार्केट संकुलातील विक्रेत्यांना अखेर ऊन पावसापासून संरक्षण मिळाले असून विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी पाठपुरावा करून या मार्केट संकुलाच्या तळमजल्यावरील छतावर निवारा शेड उभारल्यामुळे उन्हात घामाघूम होणाऱ्या आणि पावसात भिजतच मालाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मार्केट संकुलाच्या शिल्लक कामालाही गती मिळाली आहे.

गेली अकरा वर्षे या मार्केट संकुलाचे काही काम शिल्लक आहे. ते आता मार्गी लावण्यात येत आहे. राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांनी बुधवारपेठमध्ये नूतन मार्केट संकुल उभारले होते, त्याचे उद्‍घाटन तत्कालीन नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या हस्ते 19 डिसेंबर 2011 मध्ये करण्यात आले होते.

Goa Ponda Market
Goa Congress: गोवा काँग्रेसला उभारी मिळणार का? नव्या चेहऱ्यांसह 14 सरचिटणीस, 5 उपाध्यक्षांची निवड

दरम्यान, त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवी नाईक पराभूत झाल्यामुळे मार्केटच्या शिल्लक कामाचा विषय भिजतच पडला होता. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा एकदा रवी नाईक फोंड्यातून निवडून आले पण विरोधात बसावे लागल्यामुळे मार्केट संकुलाचे काम तसेच शिल्लक राहिले.

फक्त मधल्या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवी नाईक यांच्यासमवेत या मार्केट संकुलाला भेट देऊन शिल्लक कामाची पाहणी केली व हे काम त्वरित पूर्ण करण्याचे संबंधितांना आदेश दिले. तरीही काम रेंगाळतच राहिले.

रवी नाईक हे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांची वर्णी कृषिमंत्रीपदी लागल्याने सध्या कामाला वेग आला आहे. रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक हे फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी मार्केट संकुलाच्या उर्वरित कामाला चालना दिली, त्यामुळे केवळ दोन महिन्यांच्या काळात या मार्केटला शेड उपलब्ध झाली.

सध्या फोंडा पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर बसणाऱ्या विक्रेत्यांना हटवून त्यांना मार्केट संकुलातील या तळमजल्याच्या छतावरील जागेवर बसवण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी शेड नसल्यामुळे या विक्रेत्यांना ऊन आणि पावसाचा मारा सहन करावा लागत होता. या ठिकाणी बुधवार व शनिवार असे दोनच दिवस विक्रेते बसत होते.

आता शेड उभारल्यामुळे विक्रेत्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याने आठवड्याचे सर्व दिवस हे विक्रेते या ठिकाणी बसून विक्री करतात. आता तर या ठिकाणी शेड उभारल्यामुळे या विक्रेत्यांना कायमचे छत्र मिळाले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Goa Ponda Market
Goa Development: विकासासाठी कोटींच्या घोषणा! 'खरी कुजबूज'

अल्पावधीत काम पूर्ण

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्केटला शेड बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला आणि हे कामही अल्पावधीत पूर्ण करण्यात आले आहे.

याशिवाय या मार्केट संकुलाला कायमस्वरूपी वीज ट्रान्स्फॉर्मर नसल्याने या संकुलातील अनेक दुकानांचा लिलाव झाला नव्हता. त्यामुळे आता वीज खात्यात आवश्‍यक निधी पालिकेतर्फे भरला गेल्याने हा कायमस्वरूपी वीज ट्रान्स्फॉर्मरही उपलब्ध होत असल्याने हे मार्केट संकुल पूर्णपणे गजबजणार आहे.

रामा गावकर, विक्रेता, बेतोडा-

गेला बराच काळ आम्हाला ऊन आणि पावसाचा मारा सहन करावा लागायचा. पण आता नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आमची समस्या लक्षात घेऊन शेड उभारल्यामुळे आम्हांला आमचा माल विक्री करण्यास चांगली सोय झाली आहे.

वासंती नाईक, विक्रेती, कवळे-

मार्केटला शेड बांधल्यामुळे विक्रेत्यांची फार पूर्वीची मागणी पूर्ण झाली आहे. वास्तविक ही मागणी आधीच पूर्ण व्हायला हवी होती, पण रितेश नाईक यांनी तत्काळ ही समस्या जाणून घेऊन शेडची सोय केल्याने एक चांगली गोष्ट झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com