कुर्टी-फोंड्यातील चोरीप्रकरणी महिलेला अटक

वार्ताहर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कुर्टी-फोंड्यातील सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या दागिने आणि रोकड चोरीप्रकरणी संशयित चोरट्या महिलेला पकडण्यात फोंडा पोलिसांना यश मिळाले आहे. ही चोरी ८ सप्टेंबरला झाली होती.

फोंडा: कुर्टी-फोंड्यातील सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या दागिने आणि रोकड चोरीप्रकरणी संशयित चोरट्या महिलेला पकडण्यात फोंडा पोलिसांना यश मिळाले आहे. ही चोरी ८ सप्टेंबरला झाली होती. चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेने काही पैसे खर्च केल्याचे समोर आले आहे. या चोरीच्या छड्यासंबंधीची माहिती फोंडा पोलिस स्थानकात पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली. 

नागामशीद - कुर्टी येथे ८ सप्टेंबरला येथील रदिया युसूफ नामक इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी या फ्लॅटमध्ये राहणारी सुजिता दार्सी हिने फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार ८ तारखेला संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास या कुटुंबाच्या परिचयातीलच एका महिलेने तोंडाला मास्क लावून आत प्रवेश केला व आपल्याला तसेच आपला लहान मुलगा याला बेडरूममध्ये तर आपल्या नणंदेला बाथरूममध्ये बंद करून कडी लावली आणि फ्लॅटमधील सुमारे ६ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने तसेच ३८ हजार रुपये पळवले होते. 

फ्लॅटमध्ये खोलीतच अडकलेल्या सुजिता हिने कशीबशी आपली सुटका करून घेऊन पोलिस स्थानक गाठले व या चोरीची तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार फोंडा पोलिसांनी तपास करताना संशयित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या कुटुंबाच्या संबंधातील अनेक महिलांना चौकशीसाठी बोलावले. त्यात रत्नमाला चंद्रशेखर ओगुरू ही मूळची नेल्लोर - आंध्रप्रदेश येथील पण सद्या झिंगडीमळ - कुर्टी येथे राहणाऱ्या या महिलेचा पत्ता सापडल्याने तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने चोरीची कबुली दिली. 

संशयित चोरटी महिला ही मूळ आंध्रप्रदेश येथील असून तिचे वास्तव्य गेला बराच काळ गोव्यात आहे. पोलिसांनी माहिती दिल्याप्रमाणे संशयित चोरटी रत्नमाला ही तक्रारदार कुटुंबाच्या ओळखीची असून घरातील पुरुष मंडळी मूळ गावी आंध्रप्रदेश येथे गेल्याची संधी साधूनच तिने हे चोरी केल्याचे कबूल केले आहे. घरात पुरुष मंडळी नसताना दोन महिला व एक लहान मूल असल्याने त्यांना धाक दाखवून घरातील खोलीत व बाथरूममध्ये बंद करणे शक्‍य झाले, असे तिने सांगितले. 

चोरट्या महिलेकडून ६ लाख रुपयांचे दागिने तसेच १९ हजार २५० रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले. हा तपास पोलिस उपअधीक्षक नेल्सन आल्बूकर्क तसेच पोलिस निरीक्षक हरिश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप, नीतेश काणकोणकर, रश्‍मी भाईडकर, सहायक उपनिरीक्षक जीतेंद्र गावडे, हेड कॉन्स्टेबल केदार जल्मी, समीर पाटील, कॉन्स्टेबल अमेय गोसावी, गौरेश भर्तू, व मयूर जांबोडकर यांच्या पथकाने लावला. 

कोरोना काळात प्रत्येकाने सजग रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी केले आहे. कुर्टीतील या चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी व्यवस्थित तपास लावून चोरट्या महिलेला गजाआड केल्याप्रकरणी पंकजकुमार सिंग यांनी तपास पथक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या