फोंड्यात तापसरीसह डेंग्यूने काढले डोके वर! कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

फोंडा तालुक्‍यात आतापर्यंत वीसपेक्षा जास्त बळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका, त्यातच तापसरी आणि डेंग्यूमुळे पुढे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

फोंडा: फोंड्यात कोरोनासह आता पावसाळ्यानंतरची तापसरी आणि डेंग्यू आजाराने डोके वर काढल्याने लोकांत भीती पसरली आहे. फोंडा तालुक्‍यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. 

फोंडा तालुक्‍यात आतापर्यंत वीसपेक्षा जास्त बळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका, त्यातच तापसरी आणि डेंग्यूमुळे पुढे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पावसाळाकालीन व इतर रोगांवर उपचार करण्यासाठी फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ कार्यरत होते, मात्र  सध्या हे इस्पितळ पूर्णपणे कोविड इस्पितळ केल्याने फर्मागुढीतील दिलासामध्ये सोय केली असली तरी ती तुटपुंजी असल्याच्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

पावसाळा ओसरत असताना राज्यात तापसरीचा प्रकार सुरू होतो, त्यामुळे त्याचा प्रादूर्भाव होत असल्याने लोकांना थंडी, ताप, खोकला आदीचा त्रास होतो. मात्र सध्या कोरोनाचे थैमान राज्यात सुरू असल्याने "व्हायरल'' तापसरी असली तरी कोरोना रुग्ण ठरू अशी भीती लोकांकडून व्यक्त होत आहे. त्यातच डेंग्यू रुग्णही वाढत असल्याने नवीनच डोकेदुखी फोंडावासीयांसमोर उभी राहिली आहे.  दोन वर्षांपूर्वी फोंडा तालुक्‍यात प्रियोळ मतदारसंघात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. कुर्टी भागात मलेरिया तर तिस्क - फोंडा भागातही डेंग्यू रुग्ण सापडल्यानंतर यावेळी स्वच्छता मोहीम तसेच फॉगिंग करण्यात आले होते. गेल्या वर्षी डेंगूचा तेवढा प्रादूर्भाव झाला नाही, मात्र यंदा डेंग्यूने डोके वर काढल्याने लोकांत कोरोनाबरोबरच भीतीची छाया पसरली आहे. यापूर्वी प्रियोळ मतदारसंघातील मंगेशी येथील एका महिलेचा डेंग्यू तापाने बळी गेला होता. दोन वर्षांपूर्वी प्रियोळ मतदारसंघातून पंचेचाळीस  डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. आताही हा आकडा फोंडा तालुक्‍यात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून आरोग्य खात्याने जंतूनाशक फवारणी, फॉगिंग तसेच स्वच्छता मोहीम

राबवण्यासाठी जनजागृती करण्याची मागणी होत आहे. 

पोलिसांनाही डेंग्यूची लागण!
मागच्या काळात फोंडा पोलिस स्थानकातील पोलिस व गृहरक्षक मिळून बेचाळीसजणांना कोरोनाची लागण झाली होती. सर्वजण बरे झाले असले तरी आता  डेंग्यूची लागण काही पोलिसांना झाली आहे. हे पोलिस विविध ठिकाणचे असल्याने नेमके पोलिस स्थानकात की अन्य कुठून  डेंग्यू रोगाची लागण झाली, त्याची पडताळणी करण्याची गरज असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीपण पोलिस स्थानक परिसर व अन्य ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह फॉगिंग व इतर उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले
तिस्क - फोंडा येथी०ल जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची विनावापर इमारत सध्या कोविडमुळे वापरात आणण्यासाठी कार्यवाही सुरू असली तरी हे काम लांबत चालले आहे. विनावापर पडून असलेल्या या इमारतीचे दुरुस्तीकाम सुरू असून पालकमंत्री गोविंद गावडे तसेच फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी ही विनावापर इमारत वापरात आणण्यासंबंधीचे आदेश दिले होते. आयडी उपजिल्हा इस्पितळ कोविड इस्पितळ केल्यानंतर फर्मागुढीतील दिलासा इस्पितळात सध्या बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे, त्यामुळे लसीकरण व इतर कामासाठी आरोग्य केंद्र या विनावापर इमारतीत हलवण्यासाठी योग्य विचार झाला. तरीपण अजून हे दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या