गोवा वीजग्राहक धारकांना खात्याच्या तांत्रिक चुकीचा फटका

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

वीज खात्याने थकीत वीज बिले भरण्यासाठी जारी केलेल्या एकरकमी वीज बिल फेड योजनेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांना खात्याच्या तांत्रिक चुकीचा आता फटका बसू लागलेला आहे.

पणजी: वीज खात्याने थकीत वीज बिले भरण्यासाठी जारी केलेल्या एकरकमी वीज बिल फेड योजनेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांना खात्याच्या तांत्रिक चुकीचा आता फटका बसू लागलेला आहे. काही ग्राहकांनी थकीत बिलाचा पहिला हप्ता भरल्यानंतर ते दुसरा हप्ता भरण्यासाठी ऑनलाईन प्रयत्न करत असताना तुमचा पहिला हप्ता अद्याप भरलेला नाही असा संदेश त्यांना मिळत आहे. काही ग्राहकांनी पूर्ण थकित बिल भरल्यानंतर नव्याने आलेल्या बिलात थकीत बिलाची रक्कम येणे म्हणून दाखवण्याचे  प्रकार घडत आहेत. यामुळे वीज ग्राहकांत थकीत वीज बिल एक रकमी फेड योजनेबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

 याबाबत वीज खात्याचे मुख्य अभियंता राजीव सामंत यांना विचारले असता अवघ्या काही ग्राहकांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले काहीजणांनी पहिला हप्ता भरल्यानंतर त्याची नोंद योग्य प्रकारे सॉफ्टवेअर मध्ये झालेली नाही, त्यामुळे त्यांना हप्ता भरल्याचे दिसत नाही. सॉफ्टवेअरमधील ही चूक आता दुरुस्त करण्यात येत आहे. असा अनुभव आलेल्या ग्राहकाने नजीकच्या वीज केंद्रांमध्ये संपर्क साधून आपले विज बिल दुरुस्त करून घ्यावे किंवा 73 50 62 2000 या क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. काही वीज ग्राहकांनी पूर्ण थकीत बिल भरल्यानंतर हे त्यांचे आलेले नवे बिल हे थकीत रकमेसह दिसते ही बाबही खरी आहे. एकावेळी थकित वीजबिल भरल्याची तारीख आणि नवीन बिल जारी करण्याची तारीख एकच असेल तर हा तांत्रिक घोळ होतो कारण वीज बिल भरल्यानंतर त्याची नोंद यंत्रणेमध्ये होण्यासाठी दोन-तीन दिवसाचा कालावधी जावा लागतो. अशा ग्राहकांनीही वरील क्रमांकावर संपर्क साधून आपली समस्येचे निवारण करून घ्यावे.

...अन्यथा वास्को शहरातला कचरा मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर फेकू -

संबंधित बातम्या