CM Pramod Sawant: मोदींजींच्या गावी ‘सीएम’ 'खरी कुजबुज'

सावंत साहेबही प्रत्येक भाषणात ‘मोदीजी... मोदीजी आणि आत्मनिर्भर भारत’चा जयघोष करायला विसरत नाहीत
CM Pramod Sawant | Goa News
CM Pramod Sawant | Goa NewsDainik Gomantak

CM Pramod Sawant: राज्यातील निवडणुका दिमाखात जिंकल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे एक प्रभावी नेता म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रीय पातळीवरही सावंत यांचे वजन वाढले आहे. सावंत साहेबही प्रत्येक भाषणात ‘मोदीजी... मोदीजी आणि आत्मनिर्भर भारत’चा जयघोष करायला विसरत नाहीत.

आता ‘हायकमांड’च्या सूचनेवरून सावंत यांच्यावर दिल्लीनंतर गुजरातच्या प्रचाराची जबाबदारी आली आहे. गुजरात हा भाजपचा तसा बालेकिल्लाच... मग तिथे महानगरपालिकेसारख्या निवडणुकीसाठी मोठ्या नेत्यांना बोलावण्याची आवश्यकता तरी काय? असा प्रश्न काहीजण विचारत आहेत.

असो... या निमित्ताने का होईना, सीएम ‘पीएम’च्या गावात जातील. त्यांना तेथील ‘विकास’ पाहता येईल... मग ‘तो विकास’ गोव्यातही येईल. बरोबर ना!

गोवा टू गुजरात व्हाया दिल्ली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या अतिशय व्यस्त आहेत. कारण दिल्लीत आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि तेथे प्रचारासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे. त्यासोबतच राज्यात इफ्फीदेखील आहे.

त्यामुळे सध्या हातचं सोडा आणि पळत्याच्या मागे लागा अशी अवस्था मुख्यमंत्र्यांची झाली आहे. मात्र, काय करणार पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला अशा आव्हानांना सामोरे जावेच लागते. अन्यथा... तुम्ही जाणताच!

फोंड्याचा विकास रखडला

फोंड्याचे नगराध्यक्षपद म्हणजे काटेरी मुकुट आहे. कामगारांना पगार द्यायला पालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे विकासकामे आणखी कोणती डोंबलाची करणार. खरं सांगायचं म्हणजे गेल्या साडेचार वर्षांत पालिकेत एकही विकास प्रकल्प साकारला नाही.

आत्ता कुठे गाडी रुळावर येत होती, तर पुन्हा संगीत खुर्चीचा खेळ. त्यामुळे आता सरत्या वर्षात केवळ चार महिन्यांत सतारूढ मंडळ करणार काय? असा सवाल लोकच करताहेत.

आयआयटीला अपशकून

काही दिशा अशुभ मानल्या जातात. उत्तरेतून आयआयटी दक्षिणेला कणकोणात आली. दक्षिण ही यम दिशा मानली जाते, त्या ठिकाणीही तिला विरोध झाला. आता पूर्व दिशेला असलेल्या सांगे तालुक्यातही प्रखर विरोधाला या शैक्षणिक प्रकल्पाला सामोरे जावे लागत आहे.

सांगेत विरोध होत असल्याचे बघून शिरोडा मतदारसंघाचे आमदार व जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी शिरोड्यात आयआयआयटी प्रकल्पाचे स्वागत करून या प्रकल्पासाठी तयारी दर्शवली आहे. शिरोडकर यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था स्थापून आपले शिक्षण प्रेम सिद्ध केले आहे.

दुसऱ्या बाजूला आयआयआयटी प्रकल्पाचा चेंडू सांगेतून बाहेर फेकला जात असल्यास त्याची झेल घेण्यास सभापती रमेश तवडकर काणकोणात पॉझ घेऊन प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयआयटीसाठी कोणती दिशा योग्य हे येणारा काळच ठरविणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मात्र, सांगेचे आमदार हट्टाला पेटले आहेत. आयआयटीमुळे लोकमताच्या विरोधात गेल्यास आगामी निवडणुका त्यांना जड जाण्याची शक्यता असल्याचे सांगेत बोलले जात आहे.

युरी ठरला हिरो

राज्यपाल पिल्लई यांच्या गोवा ग्राम संपूर्ण यात्रेच्या राजभवनवर झालेल्या समारोप समारंभास दोन राज्यपाल, केंद्रीयमंत्री व अन्य महनीय मंडळी उपस्थित असली, तरी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीच.

कदाचित अशा राज्यपातळीवरील समारंभात बोलण्याची प्रथमच मिळालेली संधी हेही कदाचित त्या मागील कारण असेल, पण त्यांनी विरोधी पक्षनेते पदाला साजेसे भाषण केले. सरकारवर चौफेर टीका केली.

कदाचित आपण विधानसभेतच आहे असा त्यांना भास झाला असावा, पण कार्यक्रम राज्यपालांचा असल्याने सर्वांनाच ते निमूटपणे ऐकावे लागले.

आरोलकरांची भाजपशी जवळीक वाढली

मांद्रे मतदारसंघातून जायंट किलर ठरलेले भाजपचे आमदार दयानंद सोपटे यांचा पराभव करून विजयी झालेले जीत आरोलकर यांची हल्ली भाजपच्या राज्य, महाराष्ट्र आणि केंद्रातील नेत्यांकडे जवळीक वाढली आहे.

त्यामुळे ते भाजपात जातील की काय अशी सध्या मांद्रे मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पार्से येथील श्री भगवती देवीच्या जत्रोत्सवाला आले होते.

त्यावेळी पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर यांनी आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री सावंत, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, शिवाय माजी आमदार दयानंद सोपटे यांना आमंत्रित केले आणि एकाच सोफ्यावर हे तिघांनाही बसविले.

CM Pramod Sawant | Goa News
Sewage Water In Par River: धक्कादायक! पार नदीत सोडले मैलामिश्रीत पाणी; पिण्यासाठीही पुरवल्याचे स्पष्ट

यावेळी मध्ये बसलेले मुख्यमंत्री सावंत आमदार जीत आरोलकर यांच्या कानात काहीतरी सांगत होते. त्याचवेळी माजी आमदार दयानंद सोपटे यांनी दुसरीकडे मान फिरवली. त्यामुळे जीत आरोलकर यांची भाजपच्या नेत्यांकडे जवळीक वाढले असल्याच्या चर्चेला सध्या मांद्र्यात ऊत आला आहे.

पंचायत पोटनिवडणुकीत पत्रकार?

लोकशाही देशात पत्रकारांना निवडणूक लढण्यास कोणतीही हरकत नाही. गुजरात निवडणुकीत आपने एका पत्रकाराला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. आपल्या गोव्यात अनेक पत्रकारांनी राजकारणात नशीब आजमावले.

मात्र कोणीच यशस्वी झाले नाहीत. आता बाळ्ळी पंचायतीच्या एका प्रभागाची पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीत म्हणे एक पत्रकार उतरणार आहे. या पत्रकाराला म्हणे भाजपने समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तो पत्रकारही पंच बनण्यास तयार आहे. मात्र, त्याची गत पत्रकारिता सोडून राजकारणात गेलेल्या त्या अपयशींसारखी झाली नाही म्हणजे मिळवली.

बदल्यांमागील कारणे

सरकारने सध्या आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. काही मामलेदारांच्या बदल्यापाठोपाठ पाच उच्चश्रेणी अधिकाऱ्यांना बदलले. त्यातील क्रीडा संचालकांच्या बदलीबाबत अनेक प्रवाद पसरले आहेत.

CM Pramod Sawant | Goa News
Damodar Shirodkar: सोनसोडो कचरा कामाची पाहणी होणार नियमित

त्यानंतर तब्बल 28 पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्या अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. सर्वसाधारणपणे सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर अशा बदल्या होतात, पण इतक्यात काही कोणतीही निवडणूक नाही, मग हा खटाटोप का? असा प्रश्न बदली झालेल्यांना पडला आहे.

तर हल्लीच भाजपात आलेल्यांना त्यांच्या पसंतीचे पोलिस अधिकारी देणे यासाठी त्या केल्याचीही चर्चा आहे. खरे खोटे काय ते तेच जाणोत.

गोव्यात जमीन घोटाळे

देशात खऱ्या अर्थाने जर नंदनवन कोणते असे विचारले, तर गोवा हे नाव ओठांवर येते. त्यामुळेच कदाचित गोव्यात एकतरी फ्लॅट किंवा घर असावे, असे प्रत्येकाला म्हणजेच देशातील इतर राज्यांतील बड्या असामींना वाटणे साहजिकच आहे.

गोव्यातील निवासाच्या अट्टहासापायी राज्यातील अनेक जमिनींचे घोटाळे झाले आहेत, हे खरे आहे. एखाद्याची जमीन हडप करून ती अव्वाच्या सव्वा दामाने परप्रांतीयांना विकणे हा प्रकार मागच्या काळात सुरूच होता. त्यामुळेच विक्रांत शेट्टी नामक एखादा परप्रांतीय लाखो रुपये कमवून मोकळा होतो. सद्यस्थितीत या विक्रांतला जमीन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले आहे.

हा विक्रांत सोडाच, असे अनेक विक्रांत गोव्यात असतील, ज्यांनी मूळ गोमंतकीयांच्या जमिनी महाघोटाळा करून लाटलेल्या असतील, अशा लोकांची खरे म्हणजे कसून चौकशी व्हायला हवी, पण त्यासाठी तेवढी इच्छाशक्तीही हवी आहे, बरं का..!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com