उंदीर चावल्याचे निमित्त ठरले मृत्‍यूस कारणीभूत!मुख्याध्यापक वासुदेव बिचोलकर यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

म्हापशातील क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते, वेर्ला-पर्रा येथील ‘सेक्रेड हार्ट हायस्कूल’चे मुख्याध्यापक वासुदेव कृष्णा बिचोलकर (वय ५८) यांचे बुधवारी रात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. उंदीर चावल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. 

म्हापसा: म्हापशातील क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते, वेर्ला-पर्रा येथील ‘सेक्रेड हार्ट हायस्कूल’चे मुख्याध्यापक वासुदेव कृष्णा बिचोलकर (वय ५८) यांचे बुधवारी रात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. उंदीर चावल्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. 

ते मूळचे म्हापसा येथील असून, सध्या त्यांचे वास्तव्य आराडी-बार्देश येथे होते. दोन दिवसांपूर्वी १५ रोजी त्यांना उंदराने चावा घेतल्यानंतर एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेऊन ते घरी आले होते. उपचारानंतर त्‍यांना बरे वाटले होत. मात्र, काल १६ रोजी त्यांना अस्‍वस्‍थ वाटू लागले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कुटुंबियांनी त्‍यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. पण, तिथे उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र, दोन विवाहित बंधू, विवाहित बहीण असा मोठा परिवार आहे. उंदिर चावल्‍याचे निमित्त होऊन मृत्‍यू झाल्‍याने लोकांकडून आश्‍चर्य व्‍यक्त होत आहे.

जायंट्‍स ग्रुपचे ते प्रदेश सचिव होते. तसेच म्हापसा येथील श्री बोडगेश्वर संस्थानचे ते माजी सचिव होते. ‘बाबा’ या नावाने ते म्हापसा परिसरात सुपरिचित होते. 

त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची पिठाची गिरण म्हापसा बाजारपेठेत जुन्या काळापासून कार्यरत असल्याने त्यामुळेदेखील ते बाजारपेठेत परिचित होते. त्यांनी सुमारे पस्तीस-छत्तीस वर्षे हायस्कूल पातळीवर अध्यापन केले 

आहे. या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस ते शिक्षकी पेशातून निवृत्त होणार होते. ‘जायंट्‍स ग्रुप ऑफ खोर्ली सहेली’च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांचे ते दीर होत. त्‍यांच्‍या निधनामुळे हळहळ व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या