कैदी पलायन प्रकरण: तिहेरी कवच भेदलेच कसे? कोलवाळ कारागृहातील सुरक्षायंत्रणेचे ‘तीन तेरा’

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कारागृहातील सीसी टीव्ही कॅमेरे व एक्सरे बॅग स्कॅनर गेली अनेक वर्षे नादुरुस्त आहेत. ‘ऑकीटॉकी’ऐवजी तुरुंग कर्मचारी संपर्कासाठी खुलेआमपणे मोबाईलचा वापर करत आहेत. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत.

पणजी: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांचे पलायन सुरूच असल्याने तेथील चार प्रवेशद्वारावरील सुरक्षेव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस, तुरुंगरक्षक व सुरक्षारक्षक यांचे तिहेरी कवच असूनही कैदी पसार होण्याच्या घटना घडत आहे. कारागृहातील सीसी टीव्ही कॅमेरे व एक्सरे बॅग स्कॅनर गेली अनेक वर्षे नादुरुस्त आहेत. ‘ऑकीटॉकी’ऐवजी तुरुंग कर्मचारी संपर्कासाठी खुलेआमपणे मोबाईलचा वापर करत आहेत. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत.

पलायनानंतर त्रुटी उघड
दोन दिवसांपूर्वी कैद्याच्या पलायनानंतर कारागृहाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कारागृहातील त्रुटी व शक्य असलेल्या पळवाटा याबाबत तुरुंग व पोलिस अधिकाऱ्यांनी तेथील सर्व परिसराचा फेरफटका मारून तपासणी केली व काही सूचना केल्‍या. कारागृहाच्या नियमांनुसार संरक्षक भिंतीवर काटेरी तारा असणे सक्तीचे आहे. मात्र, हे कारागृहाचे बांधकाम करताना त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. कैद्यांना हे मध्यवर्ती कारागृह नव्हे तर सुधारगृहाची जाणीव करून करण्यासाठी त्यात बदल करण्यात आले. त्यामुळे कैद्यांना पलायन करण्यास संधी मिळत आहे. 

कारागृहात मोठे बदल, वरिष्‍ठ पातळीवर निर्णय
गेल्या ऑगस्ट महिन्यात कैदी हेमराज भारद्वाज पळाला होता. त्याला कचऱ्याचे काम देऊन कारागृहाबाहेर थांबणाऱ्या कचऱ्याच्या वाहनापर्यंत जाण्यासाठी तुरुंगरक्षक सोबत होता. मात्र, या तुरुंगरक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नजर चुकवून तो पळाला. कैदी भारद्वाज तसेच कैदी यल्लाप्पा याना पलायन करण्यामध्ये तुरुंगातील कर्मचाऱ्यांचा हात असल्याची शक्यता असल्याने कारागृहात मोठे बदल करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे.

कडेकोट पहारा, तरीही...
या कारागृहामध्ये चार प्रवेशद्वार आहे. कारागृहाच्या बाहेर आयआरबी पोलिस तैनात केले आहेत. त्याच्या आतील भागात प्रवेशद्वारावर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक आहेत, तर त्याच्या आतील प्रवेशद्वारावर तुरुंगरक्षकांची फळी आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक कैद्यांच्या कक्षाबाहेर तुरुंगरक्षक पहाऱ्यासाठी तैनात केलेले असतात. इतका कडेकोट पहारा असूनही हे कैदी पलायन करत असल्याने या तिन्ही सुरक्षेच्या यंत्रणेकडून निष्काळजीपणा होत आहे. कारागृहात चार ठिकाणी टेहाळणी मनोरे आहेत. मात्र, या ठिकाणीही सुरक्षारक्षक सुस्तावलेले असल्याने कैद्यांच्या पलायनाच्या घटना घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

कैद्यांमध्‍येही गटबाजी
या कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, हे कॅमेरे कारागृहातील कैदी फोडतात किंवा त्याची दिशा बदलून ठेवतात. त्यामुळे कारागृहातील घडणाऱ्या घटना टिपल्या जात नाहीत. हल्लीच तुरुंगरक्षक व कैद्यांमध्ये हाणामारीचे प्रकार घडले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्‍या सक्रियतेअभावी त्याचे पुरावे राहत नाही. या कारागृहात कच्चे कैद्यांमध्ये गटही तयार झाले आहेत. जो गट कारागृहातील अधिकाऱ्याविरुद्ध आहे त्याची सतावणूक केली जाते, तर अधिकाऱ्याला सहकार्य करणाऱ्या गटाला तुरुंगरक्षकांकडून सर्वप्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या