प्राध्यापक विशाल च्यारी आत्महत्येचे गूढ कायम; गाडीमध्ये सापडलेल्या वस्तूंवरून पोलिस तपासकाम सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

पारोडा - केपे येथील चंद्रेश्‍वर भूतनाथ पर्वताच्या डोंगराळ भागात गोवा विद्यापीठ साहाय्यक प्राध्यापक विशाल च्यारी याने गळफास घेतल्याप्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शननी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र या आत्महत्येमागील गूढ कायम असून त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पणजी: पारोडा - केपे येथील चंद्रेश्‍वर भूतनाथ पर्वताच्या डोंगराळ भागात गोवा विद्यापीठ साहाय्यक प्राध्यापक विशाल च्यारी याने गळफास घेतल्याप्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शननी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र या आत्महत्येमागील गूढ कायम असून त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या गाडीमध्ये सापडलेल्या संशयास्पद वस्तूंच्या आधारे त्याच्या मृत्यूमागील कारण पोलिस शोधत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

मेरशी येथे राहत असलेला प्रा. विशाल च्यारी हा नेहमीप्रमाणे २९ ऑगस्टला गोवा विद्यापीठात कामाला गेला होता मात्र त्यानंतर तो घरीच परतला नसल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार जुने गोवे पोलिस स्थानकात नोंद झाली होती. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली होती मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. काही दिवसांनी त्याची कार पारोडा येथे चंद्रेश्‍वर पर्वताच्या पायथ्याशी सापडली होती. त्यामध्ये असलेला त्याचा लॅपटॉप, मोबाईल, धनादेश पुस्तिका (चेकबुक), पैसे व इतर काही वस्तू सापडल्या होत्या.

या वस्तू केपे पोलिसांनी जुने गोवे पोलिसांकडे सुपूर्द केल्या होत्या. मात्र त्याचा मृतदेह केपे पोलिस स्थानकाच्या अखत्यारित असलेल्या चंद्रेश्‍वर पर्वताच्या जंगलात सापडल्याने या वस्तू पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. लॅपटॉप व मोबाईल यामधील माहितीसाठी ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले जाणार आहेत.  

विशाल चारी याची गाडी चंद्रेश्‍वर पर्वताच्या पायथ्याशी सापडल्यानंतर त्याचा जंगलात शोध घेण्यासाठी सुमारे ५० आयआरबी पोलिस यांची मदत घेण्यात आली होती मात्र तरीही त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. काल स्थानिक जंगलात गेले असता कुजलेल्या मृतदेहाचा उग्र वास आल्याने त्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्याच्या अंगावरील व बाजूला काढून ठेवलेले कपडे विशाल याचे असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी ओळखले. मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर आज अंत्यसंस्कार  झाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या