यंदा विद्यालये सुरू करू नये; म्हापशातील पालक व व्यवस्थापनांची भूमिका

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

प्राप्त परिस्थितीत गोवा सरकारला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत फारसे काहीच लागून गेलेले नाही. तसेच, सरकार विद्यार्थीवर्गाच्या आरोग्याशी खेळू पाहत आहे, अशी भावना म्हापशातील पालकांनी व्यक्त केली आहे.

म्हापसा: ‘कोविड,१९’चा धोका अजूनही कायम असल्याने तसेच पाल्यांचा तसेच विद्यार्थीवर्गाच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने विद्यमान शैक्षणिक वर्षात विद्यालये सुरू करू नयेत, अशी भूमिका म्हापसा शहरातील पालक-शिक्षक संघांच्या तसेच विद्यालयांच्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे.

प्राप्त परिस्थितीत गोवा सरकारला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत फारसे काहीच लागून गेलेले नाही. तसेच, सरकार विद्यार्थीवर्गाच्या आरोग्याशी खेळू पाहत आहे, अशी भावना म्हापशातील पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, हा गंभीर विषय शिक्षण खात्यासमोर मांडण्याचे म्हापशातील काही पालकांनी ठरवले असून, त्यानुसार या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरात लवकर लेखी स्वरूपात निवेदनही सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात म्हापशातील जी. एस. आमोणकर विद्यामंदिराच्या (पूर्वाश्रमीच्या न्यू गोवा हायस्कूलच्या) पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मंगळवार २२ रोजी इंद्रधनुष्य सभागृह, म्हापसा येथे होणार आहे. यासंदर्भातील निर्णय त्या बैठकीत अधिकृतपणे घेण्यात येईल. त्यानंतर म्हापशातील सर्व विद्यालयांचे पालक-शिक्षक संघ व व्यवस्थापन मंडळे यांची संयुक्त बैठकीत लगेच घेऊन शिक्षण खात्याला संयुक्तरीत्या निवेदन देण्यात येईल.

शैक्षणिक संस्थांचे ऑनलाइन वर्ग सुरू ठेवता येतील व त्या माध्यमातून तीन-चार महिन्यांचे छोटेखानी पूरक शिक्षणक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना त्यासंदर्भातील प्रमाणपत्रेही देता येतील. विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यांचे एक वर्ष वाया गेले तर फार मोठेसे नुकसान होणार नाही. - कमलाकांत भर्तू,एक पालक, दत्तवाडी-म्हपसा

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या